अमळनेरातील प्रभाग 1 मध्ये वीजपुरवठ्याचा झाला बट्ट्याबोळ

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा होणार उद्रेक

माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा गंभीर इशारा

अमळनेर: शहरातील प्रभाग 1 मधील बंगाली फाईल,ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर,रामवाडी, केशव नगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून महावितरणच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा कधीही उद्रेक होणार असा इशारा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी महावितरण कंपनीस दिला आहे.
45 प्लस तापमानामुळे प्रचंड उकाडा त्यात ज्या दिवशी नळांना पाणी सोडले जाते त्याच दिवशी व त्याच वेळात वीज गुल होणे असे प्रकार महिन्याभरापासून होत असताना दि 21 मे रोजी जवळपास दिवसभर वीज गुल झाल्याने या भागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कंपनीसह माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या घरावर मोर्चा नेऊन प्रचंड संताप व्यक्त केला.यासंदर्भात माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या महिन्याभरापासून अनियमित विजेमुळे नागरिकांचे होत असलेले हाल मी स्वतः त्या प्रभागाचा नागरिक म्हणून अनुभवत व सोसत असून त्यामुळे नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक आहे परंतु महावितरण कंपनी हा विषय सौम्य घेत असेल तर हा त्यांचा भ्रम असून यातून मोठा उद्रेक लवकरच पाहायला मिळणार आहे.मी स्वतः यासंदर्भात अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कुणीच गांभीर्याने घेत नाही, ज्यादिवशी पालिकेकडून पाणी सोडले जाते त्याच दिवशी व त्याच वेळात वीज गेली असल्यास आम्ही अधिकारी वर्गास फोन लावण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही घेत नाहीत.म्हणजेच अधिकारी वर्ग हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असतील तर हा विषय गंभीर असून आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने आम्हाला स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय दिसत नाही. प्रभाग 1 हा परिसर मागासवर्गीय अथवा गोरगरीब व मोलमजुरी किंवा शेती व इतर ठिकाणी मेहनतीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणारा वर्ग असून त्यांना थकूनभागून कामावरून घरी आल्यानंतर विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते. आणि नेमके याच गरजू लोकांना या रखरखत्या उन्हात विजेविना ठेवले जात असेल तर हा त्यांच्यावर मोठा अन्याय असून आता या भागाचा लोकप्रतिनिधी नात्याने मी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे.यातून नागरिकांचा जो काही उद्रेक होईल त्यातून यात्रोत्सवाच्या काळात अमळनेर शहरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.मात्र यास आमचा नाईलाज असल्याने होणाऱ्या परिणामास महावितरण कंपनी व कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहतील असेही नरेंद्र चौधरी यांनी यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]