सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा संपन्न

अमळनेर: तालुक्यातील सात्री येथे ‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा घेण्यात आला. यावेळी सुमारे ५ हजार आदीवासी बांधवांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महाआरती करून मांसाहार व व्यसन न करण्याची शपथ घेतली.

आदिवासी बांधव लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आप श्री बाबाजी चंद्रसेन पाडवी, आपश्री दादासो जितेंद्र पाडवी हे सतत प्रयत्न करीत आहेत. संत गुलाम महाराज यांच्या स्वच्छता, आरोग्य, सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि अंधश्रद्धा या पंचसुत्रावर आधारित आदिवासी बांधवांचा व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सात्री येथे सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकाच वेळी ५ हजार आदिवासी बांधवांनी आधी महाआरती केली व नंतर कोणतेही मांस भक्षण करू नये आणि दारू, ताडी, बिडी सिगारेट असे कोणतेही व्यसन करू नये अशी शपथ घेतली.

शिस्त प्रशंसनीय..!
सुमारे ५ हजार आदिवासी भिल्ल समाज एकत्र जमले होते. मात्र तरीही शांततेत सर्व महिलांनी हातात आरतीचे ताट व पुरुषांनी हात जोडून आरती व शपथ घेतली. अवघ्या एक मिनिटात सर्व आदिवासी भोजनासाठी शिस्तीत बसले. अजिबात आवाज किंवा गोंधळ नाही. स्वयंपाक करणारे देखील निर्व्यसनी होते. आणि जोपर्यन्त गुरुमंत्र होत नाही तोपर्यंत कोणीही एक घास देखील खाल्ला नाही.

या मेळाव्यास मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत माजी जिप सदस्य जयश्री पाटील, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, एल टी पाटील, अनिल शिसोदे यांच्यासह नंदुरबार ,तळोदा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाज बांधव हजर होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र बोरसे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]