मकर संक्रांतीनिमित्त श्री मंगळग्रह देवतेचे बोरन्हाण

श्री मंगळग्रह मंदिर सजले आकर्षक फुले, पतंगांनी

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात मकर संक्रांतीच्या मंगलपर्वावर १५ जानेवारी रोजी श्री मंगळग्रह देवतेचे बोरन्हाण घालण्यात आले. येथील आर्मी स्कूलचे उपशिक्षक उमेश काटे या बोरन्हाण पूजा, अभिषेकाचे विशेष यजमान होते. यासाठी मंदिर विविध आकर्षक फुले व पतंगांच्या आरासने सजविण्यात आले होते. मंदिरातील श्री मंगळग्रह देवता बालरूपात प्रतिष्ठापित असल्याने मकर संक्रांतीनिमित्ताने हा पूजा, अभिषेक करण्यात आला.

सुरूवातीला यजमान काटे यांनी देवतांचे विधीवत पूजन केले. पुजाऱ्यांनी केलेल्या विविध मंत्रघोषांच्या साथीने श्री मंगळग्रह देवतेचे बोर, ऊस, हरभरा, तीळगूळ, गोळ्या, चॉकलेट याद्वारे बोरन्हाण घालण्यात आले. याप्रसंगी काटे यांनी विश्वातील मानवजातीला व्याधी, इडा-पिडा व अनंत अडचणींतून दूर करून त्यांच्यात सदैव सुख-समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली. श्री मंगळग्रह देवतेची महाआरतीही झाली.
याप्रसंगी भाविकांची मोठी उपस्थिती होती. मंदिराचे पुरोहित सौरभ वैष्णव यांनी पौरोहित्य केले.

काय असते बोरन्हाण ?

मकर संक्रांतीला अर्थात करीदिन लहान मुलांना बोरन्हाण घालतात.काही जण रथ सप्तमीपर्यंतही हा पूजा- विधी करतात. हा लहान मुलांचा एकप्रकारे कौतुक सोहळा मानला जातो. बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. त्यानंतर पाटावर बसवून त्याचे औक्षण करतात. बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या आदी पदार्थ एकत्र करून संबंधित मुलाच्या डोक्यावरून ते टाकले जाते म्हणजेच बोरन्हाण घातले जाते. यावेळी घरातील व जवळपासची लहान मुलेही उपस्थित असतात व हे पदार्थ गोळा करून खातात.

का करतात बोरन्हाण ?

यासंदर्भात आख्यायिका अशी, की करी नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाची वक्रदृष्टी आणि अविचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वांत आधी बोरन्हाण भगवान श्रीकृष्णावर घातले गेले. त्यानंतर ही प्रथा रूढ झाली. तेव्हापासून बोरन्हाण केले जाऊ लागले. लहान मुले ही श्रीकृष्णाचे स्वरूपच मानली जातात. त्यांच्यावर करी राक्षसाची वक्रदृष्टी आणि अविचार पडू नये, यासाठी हा पूजा-विधी केला जातो. शास्त्राच्या आधारानुसार मकर संक्रांतीच्या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या हवामानाची बाधा होऊ नये व सर्व प्रकारची इडा पिडा दूर व्हावी म्हणून हे बोरन्हाण घातले जाते. या बोरन्हाणातून संबंधित पदार्थ मुलांना वेचून खाण्याची संधी दिली जाते. यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश करण्यात येतो. खेळाच्या माध्यमातून मुले ही फळे वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट यांचाही अंतर्भाव होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]