विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड

अमळनेर: ३ व ४ फेब्रुवारी रोजी साने गुरुजी यांच्या वास्तव्याने अजरामर झालेल्या अंमळनेर येथे भरणाऱ्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळख असलेले,
कथा, कादंबरी,काव्य, व्यक्तिचित्र, आत्मकथन इत्यादी विविध साहित्य प्रकारातून समाजनिष्ठ भूमिकेचे लेखन अधिक उठावदारपणे करणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी जाहीर केले आहे.
संभाजीनगर येथील महात्मा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉ.वासुदेव मुलाटे यांची
निवड घोषित करण्यात आली. शेतकरी , कष्टकरी, वंचित, दलित समूहाची दुःखे, लोकजीवनातील शोषण, उपासमार आणि सर्व बाजूंनी झालेली कोंडी मुलाटे यांच्या साहित्यातून समर्थपणे प्रकट झालेली असून, मुलाटे यांच्या लेखनातून फक्त ग्रामीण भागातीलच नाही तर ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झालेल्यांचेही दुःख उजागर झाले आहे. महात्मा फुले यांच्या विचारातून निर्माण झालेल्या ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक म्हणून त्यांची साहित्यिक क्षेत्रात ओळख आहे. वंचित ग्रामीण समाज जीवन मराठी साहित्यात प्रवाहित करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. गावकुसातील व गावकुसाबाहेरील पूर्वास्पृश्य आणि डोंगरदऱ्यातील आदिवासी असा ज्या चळवळीने ग्रामीण शब्दाला व्यापक अर्थ दिला. या चळवळीचे सारथ्य मुलाटे यांनी केले आहे. ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. डॉ. वासुदेव मुलाटे यांनी विपुल प्रमाणात, दर्जेदार साहित्य निर्माण केले असून, ‘ विषवृक्षाच्या मुळ्या’ ही कादंबरी , ‘व्यथाफूल’ , ‘अबॉर्शन आणि इतर कथा, ‘ अंधाररंग’ , ‘ झाड आणि समंध’ इ. कथासंग्रह , ‘ झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथन इत्यादी ललित साहित्य प्रसिद्ध असून ‘ सहा दलित आत्मकथने ‘ , ‘ ग्रामीण कथा स्वरूप व विकास’, ‘ ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा’, ‘ नवे साहित्य नवे आकलन’ , ‘ साहित्य : रूप आणि स्वरूप’, ‘ ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा’, ‘ साहित्य, समाज आणि परिवर्तन’ इत्यादी समीक्षात्मक ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे.
समकालीन समाजव्यवस्थेत भूमिका घेऊन लिहिणारे लेखक दुर्मिळ होत असताना, वासुदेव मुलाटे यांचे समाजनिष्ठ भूमिकेचे लेखन अधिक उठावदार आहे. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र, आत्मकथन इत्यादी विविध साहित्य प्रकारांमधून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे आजवर सहा कथासंग्रह, एक कादंबरी, चौदा समीक्षात्मक ग्रंथ, एक दीर्घ कथा संग्रह, एक एकांकिका आणि आत्मकथनासह पंधरा संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रस्थापितांच्या आमिषाला बळी न पडता त्यांनी सातत्याने परिवर्तनवादी, विद्रोही लेखन केले आहे. डॉ. वासुदेव मुलाटे यांनी अध्ययन , अध्यापन, संशोधन, समीक्षा आणि प्रकाशनाच्या माध्यमातून मराठी साहित्याच्या केलेल्या सेवेची दखल म्हणून ही निवड केल्याचेही प्रा. प्रतिमा परदेशी यावेळी सांगितले.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी यांच्यासह संघटक सत्यशोधक काॅ. किशोर ढमाले, प्रा. डॉ. अशोक चोपडे वर्धा, अर्जुन बागूल नाशिक, अमळनेर विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी प्रा.डॉ.माणिक बागले , मनसाराम पवार, लाजरस गावीत, धुळे , आमीन शेख, यशवंत बागूल, डॉ. मारोती कसाब, डॉ. व्यंकट सूर्यवंशी , दत्ताभाऊ खंकरे, अंकुश सिंदगीकर उदगीर, प्रा. विलास बुआ , प्रा. भारत सिरसाठ, अनंत भवरे, चित्रकार राजानंद सुरडकर , आर . टी. गावीत, कपील थुटे , राजेंद्र कळसाईत , आश्पाक कुरेशी इ. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]