अमळनेर साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर

संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी शासन कटीबद्ध

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या जिल्हा प्रशासनास सूचना

जळगाव:दि.२६ डिसेंबर – अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पार‌ पडणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाकडून २ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी ४० लाखांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास बाब म्हणून नगरोत्थान योजनेतून संमेलनाच्या अनुषंगाने १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडून २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारे संमेलनाच्या विविध कामांसाठी ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यानुसार संमेलनास जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी २२ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये अमळनेर साहित्य समेलनासाठी २ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा तयारीचा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरोत्थान या योजनेतून पुनर्नियोजनात साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने खास बाब म्हणून अमळनेर शहरांतील मधील अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून हा निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी मंजूर केलेल्या ४० लाखांच्या निधीतून प्रताप महाविद्यालय संमेलनस्थळी जाणाऱ्या रस्त्याची उभारणीसह दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. एमपीएलएडीएस (संसद‌‌ सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना) अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी साहित्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मधील अंतर्गत रस्त्यांच्या विविध कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. साहित्य संमेलन कामकाजाचा ते वेळोवेळी स्थानिक पातळीवर आढावा घेत आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी २५ डिसेंबर रोजी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत संमेलन आयोजनाचा अमळनेर येथे आढावा घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आज, २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संमेलनस्थळी भेट देऊन पूर्वतयारीची माहिती घेतली. आयोजकांसोबत चर्चा केली. अमळनेर साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक ठरावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. खासबाब म्हणून आमदार निधी प्राप्त करून घेण्यासाठी ही जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]