अमळनेर :नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन येथील विजय पाटील यांनी पोलिसात दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील एक दक्ष नागरिक म्हणून लेखी तक्रार करीत आहे की, सध्या बऱ्याच महिन्यांपासून अमळनेर शहरामध्ये मोकाट व भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यापैकी काहींना रेबिजची बाधा होऊन पिसाळलेले आहेत. हे सर्व मोकाट, भटके कुत्रे अनेक नागरिकांना त्यांच्यावर आक्रमण करुन चावा घेऊन गंभीर जखमी करत आहेत. तसेच त्यांचे जिवित देखील धोक्यात आणत आहेत. लहान मुलांना तर खूप मोठ्या प्रमाणावर ही कुत्रे त्यांचे भक्ष्य करत असून त्यांच्या आक्रमणातून व ते चावल्यामुळे अनेक लहान मुले व नागरिक गंभीर जखमी झाल्याचे उदाहरण गेल्या काही महिन्यात व दिवसांमध्ये शहरात घडलेली आहेत.
आताच ८ डिसेंबर रोजी अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनीत सहा वर्षाची भाग्यश्री नितिन पवार या मुलीला कुत्र्यांनी तिच्यावर आक्रमण करुन तिच्या संपूर्ण शरीरावर २५ ठिकाणी चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले होते. तात्काळ केलेल्या उपचाराने तिचा जीव तुर्तास वाचला असला तरी तिला होणारा भविष्यातील रेबिजचा धोका कायम आहे.
तरी या सर्व घटनांचा विचार करता अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोकाट कुत्र्यांचा वारंवार मागणी करुनही बंदोबस्त केलेला नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडून लहान मुलांचे व नागरिकांचे आरोग्य आणि जिवित धोक्यात आले आहे.
मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा रितसर बंदोबस्त करणे व त्यावर नियंत्रण करणे हे काम प्रशासनातील वर नमुद अधिकाऱ्यांचे आद्य कर्तव्य असून सुद्धा तसेच त्यांना हे कर्तव्य न केल्यास व टाळाटाळ केल्यास अमळनेर शहरातील लहान मुले व नागरिक यांच्या आरोग्य व जिवित कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे धोक्यात येऊ शकते, याचं ज्ञात असून सुद्धा त्यांनी आजपावेतो त्यांच्या या कर्तव्यातील टाळाटाळ व दुर्लक्ष करण्याचे कृत्य केले आहे.
करिता या मोकाट कुत्र्यांनी वर नमुद भाग्यश्रीला चावा घेऊन गंभीर जखमी करुन तिच्या जीवास धोका निर्माण केला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वर नमुद अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४॥ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी.
निवेदनावर बाळासाहेब पवार, चंद्रशेखर भावसार, ज्ञानेश्वर पाटील, विठोबा धनगर आदींच्या सह्या आहेत.