राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दाखविणार एलईडी स्क्रीनवर
अमळनेर: मदत व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील व सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे “विकसित भारत संकल्प यात्रे” चा शुभारंभ करण्यात आला, या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवली जाणार आहे.
या यात्रेचा उद्देश जनतेला शासनाच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांना या योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. या यात्रेसाठी पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विस्तार अधिकारी चिंचोरे, विस्तार अधिकारी कढाळे, अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे सचिव नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रा.सुरेश पाटील, कामगार नेते एल.टी.नाना पाटील व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
या यात्रेचे उद्घाटन करताना नामदार पाटील म्हणाले की, ही यात्रा जनतेसाठी एक वरदान आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेला शासनाच्या योजनांची माहिती मिळेल आणि त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. त्यांनी जनतेने या यात्रेत सहभागी होऊन शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी असे आवाहन केले.या यात्रेच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, मनरेगा, अटल पेंशन योजना, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल इंडिया अभियान, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजनांचा समावेश आहे.