अमळनेर: राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज दुपारी एक वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरिव वाढ करून अठरा हजार ते विस हजार रुपये करण्यात यावे,अंगणवाडी केंद्राचे काम करण्यासाठी नवीन आणि अद्यावत मोबाईल पुरविण्यात यावेत,मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे,सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा, सेविका म्हणून थेट नियुक्ती दिलेल्या मदतनीसांची सेवा सलग धरण्यात यावी,मुख्यसेविकांची रिक्त पदे भरतांना सेविकांना शिक्षणाची आणि वयाची अट शिथिल करावी,सेविकांच्या रिक्त पदांवर दहावी पास मदतनिसांना सेविका म्हणुन थेट नियुक्ती देण्यात यावी. यांसह अन्य मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
यावर मंत्री महोदयांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आणखी मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक विचार करीत असून सेविकांना कामकाजासाठी मोबाईल देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच मोबाईल पुरविले जातील, अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना विमा कवच लागु केले जाईल,मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,थेट नियुक्ती दिलेल्या मदतनिसांची सेवा सलग धरण्यासाठी निर्णय घेतला जाईल,सेविकांच्या रिक्त पदांवर थेट नियुक्तीसाठी मदतनिसांची दहावी पास अट ग्राह्य धरण्यात येईल,मुख्यसेविकांच्या पदासाठी सेविकांनी वय आणि शिक्षणाची अट शिथिल करण्याबाबत पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे मंत्री तटकरे यांनी बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा केली.
सदर बैठकीत महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनुपकुमार यादव, उपसचिव श्री.विलास ठाकूर, कक्ष अधिकारी श्री.जाधव,एबाविसेयोचे उपायुक्त श्री.विजय क्षीरसागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि आपल्या संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर आणि कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील उपस्थित होते. बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली आहे.