पाडळसरे धरण संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत खासदारांसोबत समितीही आंदोलन करणार

मात्र खासदार यांनी शासन प्रशासनाविरोधात आंदोलन न केल्यास जनआंदोलन समितीमार्फत खासदारांच्या दाराशी आंदोलन करण्यात येईल असा इशारा

अमळनेर:पाडळसरे धरण संदर्भात शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमनुसार काम न झाल्यास खासदारांसोबत समितीही आंदोलन करणार आहे.मात्र खासदार यांनी शासन प्रशासनाविरोधात आंदोलन न केल्यास जनआंदोलन समितीमार्फत खासदारांच्या दाराशी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे.
पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात चालढकल व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खासदार यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर धरण जन आंदोलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीच्या कार्यालयात झाली. पाडळसरे धरणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या स्तरावर सुधारित प्रशासकीय मान्यता दीर्घ काळापासून प्रलंबित आहे तर सदर प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा यासाठी पाडळसरे धरण जन आंदोलन समिती सातत्याने आंदोलन व पत्रव्यवहार यासह पाठपुरावा करीत आहे. सदर बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या व प्रशासनाच्यावतीने पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात दिलेली मुदत संपताच खासदार यांनी जाहीर केले प्रमाणे आंदोलन करावे समिती सदर आंदोलनात सहभागी होईल असे सर्वानुमते ठरले. तर सुस्त पडलेल्या प्रशासनाविरोधात लोकसभा मतदार संघाचे खासदार या नात्यानें जाहीर केलेले आंदोलन न केल्यास मात्र खासदारांच्या दाराशीच जनआंदोलन समिती आंदोलन करेल. असेही समितीच्या बैठकीत ठरले आहे. बैठकीस समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, रणजित शिंदे,रामराव पवार,महेंद्र बोरसे,एन के पाटील,संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, रियाज मौलाना,महेश पाटील, पुरुषोत्तम शेटे, प्रसाद चौधरी, प्रविण संदानशिव,सुशील भोईटे,नारायण बडगुजर,दिलीप हातागळे आदिंसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रश्न मार्गी लागावा म्हणून समितीच्या वतीने नुकतेच राज्याचे जलसंपदा व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.श्री.अनिल भाईदास पाटील, जळगाव पालकमंत्रीना. श्री. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी, जळगाव, पोलीस अधिक्षक,जळगाव
तसेच भा.ज.प.केंद्रीय नेते मा.श्री.विनोद तावडे यांना याबाबत पत्र व ई-मेलने निवेदन पाठवून समितीतर्फे अवगत करून देण्यात आलेले आहे.
चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरी पुत्र व समितीचा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनीही मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून पाडळसरे धरण तातडीने पूर्ण होणे बाबत मागणी केली असून उर्वेश साळुंखेच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय समितीने सदर बैठकीत घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *