महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न सुटणार,वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत मिळविला दहा कोटींचा निधी,पथदिव्यांचाही समावेश
अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीपदी विराजमान झालेल्या नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाचा मतदारसंघास लाभ काय? याची पहिली झलक दाखविली असून शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 10 कोटी निधीस मंजुरी मिळविल्याने शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.याच निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंग पथदिवे,योगा हॉल आणि भूखंड सुशोभीकरण आदी कामे होणार आहेत.
विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते प्रभाग क्रमांक 9 म्हणजे मुख्य बाजारपेठ परिसरातील असल्याने या नव्या रस्त्यांमुळे बाजारपेठेचेही भाग्य उजळून व्यावसायिक व नागरिकांची समस्या सुटणार आहे. सदर कामांतर्गत काही रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासह होणार आहेत.याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने दि 23 ऑगस्ट रोजी उपसचिव प्रशांत आंडगे यांच्या सहीने अमळनेर नगरपरिषदेसाठी प्रसिद्ध झाला असून अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे होणार असल्याची माहिती नामदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
भुयारी गटारीच्या कामापासून शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने या रस्त्यांना नागरिक अक्षरशः वैतागले होते,पावसाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल होत होते,बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची अशी वाईट अवस्था असल्याने शहराच्या सौंदर्यात देखील कुठेतरी बाधा निर्माण झाली होती,यामुळे प्रभाग 9 मधील न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील नामदार अनिल पाटील यांची भेट घेऊन या रस्त्यांचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी केली होती.याशिवाय इतर प्रभागातील नागरिकांनी देखील रस्त्यांची मागणी केली होती.
दरम्यान नागरिकांचे हाल लक्षात घेता मंत्रीपदी विराजमान होण्याआधीच अनिल पाटील यांनी शहरातील रस्त्यांसाठी निधीची मागणी शासनदरबारी करून प्रयत्न सुरू केले होते,त्यातच त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने मंजुरीच्या प्रक्रियेस वेग आला.मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व ना अजित पवार, नगरविकास मंत्री यांच्या सहकार्याने वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत 10 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.लवकरच या रस्त्यांची टेंडर प्रोसेस व वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
हे होणार दहा रस्ते मिळालेल्या 10 कोटी निधीपैकी प्रत्यक्ष 7 कोटी 30 लक्ष निधीतून दहा रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे.यात
पिंपळे रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे(2 कोटी )प्रभाग क्रमांक 9 मध्ये
पाचपावली चौक ते वीर समशेरसिंग पारधी चौक ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे (80 लक्ष),पिंपळे रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे(2 कोटी ),बसस्टँड ते स्टेट बँक चौक पर्यंत रस्ता मजबुतीकरणं व डांबरीकरण करणे (80 लक्ष ),दुर्गा टी ते डॉ अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापर्यंत पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे(70 लक्ष),मंगलमूर्ती पतपेढी ते बीएसएनएल कार्यालया पर्यंत रस्ता मजबुतीकरणं व डांबरीकरण करणे(50 लक्ष),लालबाग टाकी ते बोहरी पेट्रोल पंप पर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे(60 लक्ष) प्रभाग 2 मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणं करणे (50 लक्ष),आर के नगर भागात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे(40 लक्ष),सिंधी कॉलनी भागात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (40 लक्ष),साळीवाडा परिसरात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (40 लक्ष) आदी दहा रस्त्यांची कामे होणार आहेत.
पावणेतीन कोटी निधीतून होणार ही कामे,,, उर्वरित 2 कोटी 70 लक्ष निधीपैकी दीड कोटी निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंगचे पथदिवे लागणार असल्याने अनेक प्रभाग चकाकणार आहेत,याशिवाय गट न 168/11 व गट नंबर 144/अ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 40 लक्ष निधीतून योगा हॉलचे बांधकाम व 40 लक्ष निधीतून गट नंबर 1433 येथे खुला भूखंड विकसित केला जाणार आहे. सदर महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न मंत्री अनिल पाटील यांनी मार्गी लावल्याने न्यू प्लॉट परिसर विकास मंच,बाजारपेठेतील व्यापारी बांधव,लहानमोठे व्यावसायिक इतर प्रभागातील नागरिक यांनी मंत्री अनिल पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तर अनिल यांनी सदर मंजुरी बद्दल मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,ग्रामविकास ना गिरीश महाजन यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.