लाईट, पाणी, धावपट्टी, ओपन जिमसह पार्किंग व कंपाऊंडची सुविधा तातडीने उपलब्ध करा; मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा

अमळनेर : शहरातील क्रीडा संकुलात सरावासाठी येणाऱ्या खेळाडू तसेच विविध शासकीय भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मूलभूत सुविधांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्रीडा संकुलातील सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी समाजसेवक ललित यशवंत सातपुते यांनी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
क्रीडा संकुलात दररोज मोठ्या संख्येने युवक-युवती पोलीस, सैन्य, वनविभाग तसेच अन्य शासकीय सेवांच्या भरतीसाठी शारीरिक सराव करतात. मात्र, मैदानावर आवश्यक त्या सुविधा नसल्याने त्यांच्या सरावात अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रात्रीच्या सरावासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. मैदानावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, धावण्यासाठी योग्य ट्रॅक उपलब्ध नसणे तसेच फुटबॉल खेळासाठी आवश्यक पोल नसणे, या बाबींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
क्रीडा संकुलातील ओपन जिममधील काही व्यायाम साहित्य खराब व तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नवीन साहित्य बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मैदानावर सरावासाठी येणाऱ्या युवक-युवतींच्या वाहनांसाठी स्वतंत्र व सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
महिला व युवतींच्या सोयीसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कपडे बदलण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने महिला खेळाडूंना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
मैदानावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे परिसरात साप, विंचू तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्था व मैदान परिसरातील आवश्यक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे असल्याचे सातपुते यांनी निवेदनात म्हटले आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातूनही अनेक युवक-युवती शासकीय नोकरीच्या भरतीपूर्व तयारीसाठी क्रीडा संकुलात येतात. त्यामुळे क्रीडा संकुलाचा केवळ मैदान म्हणून नव्हे, तर खेळाडू व भरतीपूर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा असलेले केंद्र म्हणून विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
क्रीडा संकुलात विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्जेदार धावपट्टी, ओपन जिमची दुरुस्ती, पार्किंग, फुटबॉल पोल, महिला चेंजिंग रूम आणि कंपाऊंडचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही न झाल्यास भरतीप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून आमरण उपोषण करण्याचा इशारा ललित यशवंत सातपुते यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती क्रीडामंत्री, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी अमळनेर, तहसीलदार अमळनेर तसेच अमळनेर नगरपरिषद प्रशासनाकडे माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.








