
अमळनेर : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.
देवगाव-देवळी, अमळनेर येथील आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.च्या बेस कॅम्प येथे सकाळी ८ वाजता राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडला. यावेळी श्रीमती पुष्पाबाई भाईदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, हिंगोणे येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांच्यासह जयनिल फाऊंडेशनचे सदस्य आणि आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेले अमूल्य स्वातंत्र्य जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असून, राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.









