अंबरनाथ आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाहतूक सुरक्षितता, नागरी कर्तव्ये व शिवचरित्राचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

अंबरनाथ प्रतिनिधी : वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबरनाथ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवारी (दि. २५) उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षितता, नागरी कर्तव्ये आणि शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे सीनियर गटनिदेशक एस. एम. जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
प्रमुख पाहुणे आरएसपीचे विभागीय अधिकारी मनीलाल शिंपी यांनी ‘वाहतूक नियमांचे पालन’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात टाळता येतात व जीवन सुरक्षित राहते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी, कलाशिक्षक व व्याख्याते संदीप ईश्वर पाटील यांनी ‘शिवराज्याभिषेक, पंच परिवर्तन, नागरी कर्तव्ये व शिष्टाचार’ या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या ओजस्वी आवाजातील गीते, कविता आणि शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वराज्य, राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमास संस्थेतील गटनिदेशक, निदेशक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रम अधिकारी एम. के. सरवदे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
ठळक बाबी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
हेल्मेट व सीट बेल्ट वापरावर भर
शिवराज्याभिषेक व नागरी कर्तव्यांवर मार्गदर्शन
गीते, कविता व शिवचरित्रातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें