
{ अटकावं न्यूज हितेंद्र बडगुजर }:-
अमळनेर : अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयासाठी २० अतिरिक्त पदांना मंजुरी दिली असून यामध्ये चार डॉक्टरांसह विविध कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमळनेर व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
२४ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या अथवा श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. अमळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुमारे ९० टक्के पूर्णत्वास आले असल्याने या रुग्णालयालाही नव्या पदांचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या तब्बल २४ वर्षांनंतर रुग्णालयाच्या मनुष्यबळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
चार डॉक्टरांसह विविध पदांची भर
पूर्वी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अशी एकूण २९ पदे कार्यरत होती. नव्याने मंजूर झालेल्या २० पदांमध्ये एक शल्यचिकित्सक (सर्जन), एक फिजिशियन तसेच दोन एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश आहे. याशिवाय परिचारिका व इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ही अतिरिक्त पदे उपलब्ध होत असल्याने रुग्णालयाची आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे.
पाठपुराव्याला यश
अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे कामही वेगाने सुरू झाले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. आता अतिरिक्त पदांना मंजुरी मिळाल्याने रुग्णालयातील सुविधा आणि उपचार क्षमता आणखी वाढणार आहे.
या प्रक्रियेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. तसेच या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे त्यांनी आभार मानले.
या निर्णयामुळे अमळनेरसह परिसरातील हजारो रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.








