सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई? दिल्लीतून काँग्रेस हायकमांडच्या सूचना.

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना केंद्रीय कार्यकारणीने प्रदेश समितीला दिल्या आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून लवकरच यासंबंधीचा आदेश जारी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्यजीत तांबे हे आमदार-खासदार नसल्याने त्यांच्याविरूद्धची कारवाई केंद्रीय शिस्तभंग समितीकडून नव्हे तर प्रदेश काँग्रेसत्या स्तरावरच होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय समितीचे सदस्य तथा प्रदेश महासचिव विनायक देशमुख यांनी दिली. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच सत्यजीत यांच्याविरूद्धही निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
सत्यजीत तांबेंनी मोदींच्या फोटोला काळे फासतानाचे जुने फोटो व्हायरल; काय आहे नेमके प्रकरण?
पक्षाने उमेदवारी देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने निलंबित केले असून यांची चौकशी सुरू केली आहे. यावर डॉ. तांबे यांनी प्रतिक्रिया देताना आपली चूक नसल्याचे व चौकशीत सर्व सत्य समोर येईल, असे म्हटले आहे. डॉ. तांबे यांच्यावर कारवाई झाली तेव्हाच सत्यजीत यांच्यावर ती का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. यासंबंधी असे सांगण्यात आले की. डॉ. तांबे यांच्यावर पक्षाच्या शिस्तभंग विषयक समितीने कारवाई केली आहे. प्रदेशाकडून पाठविण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार ही कारवाई केली. डॉ. तांबे आमदार असल्याने त्यांचे प्रकरण या समितीकडे पाठवावे लागले होते. मात्र, सत्यजीत आमदार नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंबंधीचा निर्णय या समितीकडून नव्हे तर प्रदेशाकडून होणे अपेक्षित आहे. आता डॉ. तांबे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सत्यजीत यांच्याविरूद्धही कारवाई करण्याच्या सूचना प्रदेश समितीकडे आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार लवकरच यासंबंधीचा आदेश तांबे यांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]