पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

अमळनेर (योगेश पाने) – महाराष्ट्रातील पत्र महर्षी कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण दिनांक 6 जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकार दिन साजरा करीत असतो. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो परंतु दुर्दैवाने सन 2014 नंतर भारतात लोकशाहीचे चारही खांब उध्वस्त करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. चौथ्या स्तंभात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असे दोन प्रकार येतात. आज घडीला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया 90 ते 95% गुजराती उद्योगपती अंबानी व अदानीच्या छत्रछायेखाली गेल्यामुळे भारतातील सुमारे 70 ते 75 % लोकांनी विविध चॅनलच्या बातम्या पाहणे बंद केलेले आहे. आजही प्रिंट मीडिया 60% शाबूत आहे त्यामुळे जागृत नागरिक रोज सकाळी आपापल्या आवडीच्या पेपरची आतुरतेने वाट पाहत असतात आणि जगात होणाऱ्या घटनांचा वेध घेत असतात. मी या लेखात इलेक्ट्रॉनिक्स मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांविषयी काहीही बोलणार नाही. पूर्वीचे पत्रकार बांधव मुंबई, दिल्लीत लोकल ट्रेनने प्रवास करून ऑफिसला जात होते. तेच पत्रकार सन 2014 नंतर विकले गेलेत आणि अब्जाधीश झालेत. तीच कीड प्रिंट मीडियातील 40% पत्रकारांना लागली. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील तेच ते 40% पत्रकार आहेत जे फक्त लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे पाकिटे घेण्यासाठी येतात. निवडून आलेल्या आमदार व खासदारांच्या आर्थिक मेहरबानीने अभ्यास दौरे काढतात. पत्रकार दिनासारख्या पवित्र दिनी विविध राजकीय पक्षांचे पुढारी काय प्रेझेंट देतात ? त्या दिवशी मिळणारे जेवण हे शाकाहारी असेल की मांसाहारी (साग्रसंगीतासह) या 40% पत्रकारांमुळेच उर्वरित 60% प्रामाणिक पत्रकारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. पत्रकारिता हे सतीचे वाण आहे. कधी नव्हे ते आज आपल्या महाराष्ट्र राज्याला व भारताला प्रामाणिक पत्रकारांची नितांत आवश्यकता आहे तुमच्या लेखणीत खूप मोठी ताकद आहे. त्या ताकदीचा वापर जनसामान्यांच्या हितासाठी करा, भ्रष्टाचारांच्या विरोधासाठी करा, महागाईच्या विरोधात लेख लिहा, समाजात अंधश्रद्धा खूपच आहे त्या विरोधात लेखणी झिजवा. परमेश्वर तुम्हाला आयुष्यात अन्य रूपाने भरभरून देईल. नाहीतर ग्रामीण भागात राजकीय पुढार्‍यांनी पत्रकारांची एक व्याख्या केलेली आहे. एक क्वार्टर, एक हाफ मटन, चार चपाती, एक पापड व एक हाफ जीरा राईस विथ मटन रस्सा. त्यावेळी प्रामाणिक पत्रकारांची तळपायाची आग मस्तकात जाते. महाराष्ट्रातील सर्वात सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांना पवित्र पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राला पत्रकारितेचा फार मोठा वारसा आहे. अनेक नामवंत पत्रकारांनी त्या त्या वेळेस आपली कारकीर्द गाजविली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी साप्ताहिक ‘हरिजन’ सुरू केला होता. आचार्य विनोबा भावेंनी भूदान चळवळ यशस्वी होण्यासाठी ‘संघर्ष हमारा नारा है’, हे हिंदी साप्ताहिक सुरू केले होते. परमपूज्य सानेगुरुजींनी सन 1938 ते 1940 या काळात अंमळनेरात पहिले साप्ताहिक ‘काँग्रेस’ सुरू केले होते. हा सर्व ब्रिटिश कालावधी होता त्यावेळी पत्रकारितेचा वापर जनसामान्यांच्या संघटीत होण्यासाठी होत असे आणि ब्रिटिश ध्येयधोरणे किती चुकीची आहे यावर ही मान्यवर मंडळी प्रहार करीत असत. साप्ताहिक काँग्रेस या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते ‘काँग्रेस मायबाप जाळीन सर्व ताप ‘ हे वृत्तपत्र अमळनेरातील सराफ बाजारात असलेल्या अरविंद प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले जात होते. आणि माझ्या आजोबांच्या सराफ बाजारातील भारत वॉच कंपनी या दुकानातून सर्वत्र वितरित होत असे. त्यावेळी ब्रिटिश सरकारने माझे आजोबा रामजीबाबा मिस्त्री यांना विविध गुन्ह्याखाली तीन वेळेस अटक केली होती. तिथूनच आमच्या घराण्याचा पत्रकारितेशी घनिष्ठ संबंध आला. त्यानंतर माझे आदरणीय पिताश्री कै. माधवरावजी सुतार यांनी सन 1947 ते 1984 अशी 37 वर्षे पत्रकारिता केली होती. त्यानंतर आज तागायत आम्ही दोन्हीही भाऊ श्री विजयकुमार सुतार व मी राजेंद्र सुतार मागील 45 वर्षापासूनचे निर्भीड व निस्वार्थ पत्रकारिता करीत आहोत. माझे वडील कै. माधवरावजी सुतार हे सन 1946 चे वाडिया कॉलेज पुण्याचे बी.एससी. पदवीधर होते. पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी अनेक सरकारी नोकरीचा त्याग केला होता त्यांनी सतत अन्याय विरुद्ध लिखाण केले होते.

अमळनेर तालुक्याचे पहिले पत्रकार अर्थातच परमपूज्य सानेगुरुजी. त्यांनी अमळनेरात ‘काँग्रेस’ वृतपत्र काढले व पुण्यात 15 ऑगस्ट 1948 रोजी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले होते. त्यानंतर असंख्य नामवंत पत्रकारांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे. त्यात सर्वश्री कै. माधवरावजी सुतार, कै. बाळासाहेब साळवी, कै. मधुकरराव अमळगावकर, कै. प्रा. डी. के. देशपांडे, ऍड. मो. द. ब्रह्मे, केदार ब्रम्हे, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कै. नामदेवराव पाटील, कै. पी. जी. आप्पा देशमुख, साहित्यिक कवी सुभाष पाटील (घोडगावकर), जेठमलजी जैन, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, कवी साहित्यिक कै. गं. का. सोनवणे सर, कैलासवासी ना. स. बडगुजर, विलास भामरे, जगन्नाथ.एस.बडगुजर ,विजयकुमार सुतार, राजेंद्र सुतार, राजकुमार छाजेड, अशोक छाजेड, बाळकृष्ण बागुल, महेशबापू देशमुख, पांडुरंगराव पाटील, राजू महालेसर, किरण पाटील आदींचा समावेश आहे. नव्या पिढीमध्ये सर्व श्री विवेक अहिरराव, चेतन राजपूत ,किरण पाटील, गौतम बिऱ्हाडे, ईश्वर महाजन, प्रा. डॉ. दिलीप भावसार, चंद्रकांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, चंद्रकांत काटे, कै. राजेंद्र पोतदार, ,विजय गाढे गुरुदासमल बठेजा, झामनदास सैनानी, हितेश बडगुजर, योगेश पाने,समाधान मैराळे, सुरेश कांबळे, प्रा. सौ जयश्री साळुंखे, प्रा. पी. एम. नेरकर ,प्रविन बैसाने,नुर खान,अहिरेआदींचा समावेश आहे. जुन्या जमानातील कवी व साहित्यिक माधव जुलियन यांनी काही वर्षे प्रताप हायस्कूलला शिक्षक म्हणून नोकरी केली होती त्यानंतर ते पुण्याला स्थायिक झाले होते तेथे त्यांनी ‘दैनिक केसरी’ या वृत्तपत्रासाठी विपुल प्रमाणात लिखाण केलेले होते. तेथील सुप्रसिद्ध ‘रविकिरण साहित्यिक मंडळाचे’ ते अनेक वर्ष अध्यक्ष होते.

त्याचप्रमाणे प्रेस फोटोग्राफर म्हणून अमळनेरात सर्वश्री प्रभाकरराव उर्फ बाळासाहेब पवार, वसंतराव बारी व रमेशभाऊ सोनार हे होते. त्यापैकी वसंतराव बारी, रमेशभाऊ सोनार हे स्वर्गवासी झालेले आहेत. बाळासाहेब पवार यांचे दोन्हीही सुपुत्र सर्वश्री रॉकी पवार, अंमळनेर व मंगेश पवार मुंबई येथे फोटोग्राफीच्या व्यवसायात आजही कार्यरत आहे.

आता आपण अमळनेरतील जुने पत्रकार व त्यांचे वारसदार यांचा उल्लेख पाहूया. कै. माधवरावजी सुतार (साप्ताहिक लोकमानस संस्थापक संपादक) व त्यांचे वारस श्री विजयकुमार सुतार (संपादक साप्ताहिक लोकमानस) व मुंबईचे मुक्त पत्रकार राजेंद्र सुतार (लिखाण – महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता व द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई), अहिराणी कवी साहित्यिक श्री कृष्णा पाटील वय वर्ष 82 यांनी जळगावच्या दै. जनशक्ती मध्ये विपुल प्रमाणात लिखाण केलेले आहे. तसेच त्यांनी अनेक साहित्य संमेलने गाजवलेली आहेत. ते जुने पत्रकार कै. नामदेवराव पाटील यांचे पत्रकारितेतील सन्माननीय गुरु आहेत. त्यांचे सुपुत्र पत्रकार संजय पाटील हे देखील मागील पंधरा वर्षापासून जळगाव जिल्ह्यात पत्रकारिता करीत आहे. त्यांची पत्रकारितेची सुरुवात दैनिक सचोटीपासून सुरू होऊन दैनिक देशदूत आणि आता जळगावच्या दैनिक लोकमतला सुरू आहे. तसेच दुसरे नामांकित कवी साहित्यिक श्री सुभाष पाटील घोडगावकरांनी जळगाव, धुळे जिल्ह्यातील अनेक नामवंत वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणावर लिखाण केलेले असून अनेक स्तंभ लेख लिहिलेले आहेत. जळगाव आकाशवाणी केंद्रावर पत्रकार कै. माधवरावजी सुतार व सुभाष पाटील यांचे जिल्हा वार्तापत्र येत असे. त्याचप्रमाणे जे.डी.सी.सी. बँकेचे माजी बँक इन्स्पेक्टर कै. पी जी आप्पा देशमुख यांनी प्रबोध चंद्रिका जळगाव, दैनिक बातमीदार जळगाव, दैनिक वार्ता धुळे, साप्ताहिक धरणी धरणगाव या वृत्तपत्रात पत्रकारिता केलेली आहे. कै. पी. जी. आप्पांचे सुपुत्र श्री महेश देशमुख यांनी सन 1992 साली ‘दैनिक जग आवर्त’ सुरू केले होते. तसेच अंमळनेर येथील राष्ट्रसेवा दलाचे कट्टर कार्यकर्ते श्री विनोद संतोषराव पाटील हे पुण्याच्या राष्ट्रसेवा दल पत्रिकेचे विद्यमान संपादक असून पुण्याच्या ‘साप्ताहिक साधना’ या मासिकेसाठी लिखाण करीत असतात. अशी फार मोठी यादी अमळनेरच्या पत्रकारांची आणि त्यांच्या वारसदारांची आहे. आमचे परममित्र श्री अरविंद मुठे यांचे सुपुत्र श्री गौरव मुठे हे देखील पुण्यात दैनिक सकाळमध्ये पत्रकारिता करीत आहे.

माझे परमपूज्य पिताश्री कै. माधवराव सुतार यांनी मुंबईच्या दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक लोकसत्ता, पुण्याचे दैनिक केसरी, दैनिक तरुण भारत, जळगावचे दैनिक गावकरी, दैनिक लोकमत, धुळ्याचे दैनिक आपला महाराष्ट्र, दैनिक स्वतंत्र भारत, नागपूरचे साप्ताहिक विवेक आदि वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली होती. माजी मंत्री नामदार उत्तमराव नाना पाटील यांच्या ‘साप्ताहिक सुदर्शनचे’ दहा वर्ष सहसंपादक होते व त्यानंतर अंमळनेरात दिनांक 26 जानेवारी 1969 रोजी ‘साप्ताहिक लोकमानसची’ स्थापना करून दोन वर्ष दैनिकही चालविले. त्याशिवाय ते ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी होते. ते जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष असून महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांनी संयुक्त खानदेश वार्ताहर संघाची निर्मिती करून अनेक पत्रकारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून अनेकांना कायदेशीर न्याय मिळवून दिला होता. सन 1977 साली त्यांनी अमळनेर तालुका पत्रकार संघाची स्थापना करून पहिले अध्यक्ष बनण्याचा त्यांना बहुमान मिळालेला होता. संयुक्त खानदेश वार्ताहर संघाचे ते अनेक वर्ष अध्यक्षही होते ग्रामीण भागातील पत्रकारांवरील कायदेशीर अन्याय दूर करण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळचे सहकारी कै. बाळासाहेब साळवी यांची तोलामोलाची साथ मिळालेली होती. या लेखातील फोटो दिनांक सहा जानेवारी 1980 रोजी झालेल्या पत्रकार दिनाचा आहे. ह्या फोटोत कै. माधवरावजी सुतारांसोबत कै. बाळासाहेब साळवी, कै. मधुकरराव अंमळगावकर, कै. नामदेवराव पाटील, साहित्यिक कृष्णा पाटील, कै. पी. जी. आप्पा देशमुख, कै. वसंतराव बारी, कै. रमेशभाऊ सोनार, विजयकुमार सुतार, राजेंद्र सुतार व राजकुमार छाजेड हे दिसत आहे पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय हिंद जय महाराष्ट्र….

सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]