आज 4 डिसेंबर…
गेट वे ऑफ इंडिया 98 वर्षाचे झाले 4 डिसेंबर 1924
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असण्या बरोबरच ह्या बहुरंगी, बहुढंगी शहराने सांस्कृतिक विविधताही जपली आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराने कलात्मक वारसाही जपला आहे. वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले गेट वे ऑफ इंडिया त्यातीलच एक.
इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या 1911 सालच्या ऐतिहासिक भेटी स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. जॉर्ज यांच्या स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगलाई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. भेटीच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तु म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. हे 4 डिसेंबर 1924 साली लोकांसाठी खुले करण्यात आले.
गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बसातर दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे. नजीकच्या ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता. वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. तिच्या लांबीची एक बाजू पूर्वेकडील सागरतीराला समांतर असून या बाजूत मधोमध मोठ्या आकाराचा कमानयुक्त दरवाजा व त्यालगत दोन्ही बाजूस छोटे दरवाजे आहेत. वास्तूची मागची बाजूही सारखीच आहे. या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्ष लागले.
मुंबईत पाय ठेवला की पर्यटकांची पहिली भेट असते ती अर्थातच गेटवे ऑफ इंडिया. गेटसमोर व बाजूच्या बागेत पर्यटक छायाचित्र काढून आपल्यासोबत स्मृती घेऊन जात असतात.
मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.