१ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
अमळनेर : अमळनेर पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी हेडावे येथे सापळा रचून पकडण्यात आले. आरोपींकडून सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस निरीक्षक विकास देवरे याना गोपनीय माहिती मिळाली की तालुक्यातील सारबेटे येथून एम एच १९ ,डी यु ९५४३ या मोटरसायकलवर दोन जण अमळनेर शहरात गांजा विकण्यासाठी आणत आहेत. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , जितेंद्र निकुंभे ,अमोल पाटील , विनोद संदानशीव ,संतोष नागरे , सागर साळुंखे याना घेऊन हेडावे गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास दोन जण मोटरसायकल क्रमांक एम एच १९ , डीयु ९५४३ वर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्या दोघांच्या मध्ये पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी आढळून आली. त्यात गांजा सापडला. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता अकील इब्राहिम मेवाती वय ३७ व मोहसीनखान शरीफखान मेवाती वय ३२ दोन्ही रा सारबेटे असे सांगितले. पोलिसांनी शासकीय अधिकार्यांच्या समक्ष गांजाचे मोजमाप केले असता ६८ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४३२ग्राम गांजा , ६० हजार रुपये किमतीची गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व १० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे कॉ . मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८ ,२० ,२२ व भारतीय न्यायासंहिता २०२३ च्या कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. आरोपीना अटक करण्यात आली आहे.