मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती
अमळनेर: नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी शासन स्तरावरील सर्व विभाग व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून मदतकार्य केल्याने मृतदेह वेळीच आणण्यात यश मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला उत्तर काठमांडू (नेपाळ) कडे जाताना भीषण अपघात झाला होता. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस खोल नदीत कोसळून बसमधील 26 भाविकांचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली. दुथडी भरुन वाहणाऱ्या नेपाळमधील नदीत काही भाविक वाहून गेले असल्याने त्यांचा शोध लागलेला नव्हता. हे सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल व परिसरातील आहे. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 120 किलोमीटरवर पश्चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यामुळे काही भाविकांना वाचविण्यात यश मिळाले तर बेपत्ता भाविकांसाठी शोधकार्य सुरुच होते.
मदतीसाठी असा होता समन्वय गट मंत्री अनिल पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की महाराष्ट्र शासनाने सदर दुर्घटनेबाबत मदत कार्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्वामध्ये योग्य समन्वय व्हावा यासाठी एक व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला यात प्रतिनिधी भारतीय दूतावास नेपाळ, श्री.वस्त्स सदस्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, प्रतिनिधी भारतीय वायु सेना, प्रतिनिधी भारतीय सशस्त्र दल, मुख्यमंत्री कार्यालय उत्तर प्रदेश, मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र शासन, मंत्री कार्यालय आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग महाराष्ट्र, अवर आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, जिल्हाधिकारी जळगाव, मंत्रालय नियंत्रण कक्ष आदी 11 जणांचा समावेश होता. सदर अपघातातील मृतदेह तात्काळ जळगाव येथे आणता यावेत याकरिता मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचासोबत पत्रव्यवहार करण्यात आला तसेच भारतीय वायु सेना व भारतीय दूतावास नेपाळ यांच्या सोबत समन्वय साधण्यात आला. सदर बस दुर्घटनेतील सर्व २६ मृत व्यक्ति भुसावळ जिल्हा जळगाव येथील असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे हे स्वतः दिल्ली येथे पोहोचले त्यांनीही त्याठिकाणी संपर्क साधून आर्म फोर्स चे विमान त्यांनी मिळविले. तेथून त्यांचे मृतदेह दिनांक २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजे पर्यन्त भारतीय हवाई दलाच्या सी- १३० या विशेष विमानाच्या माध्यमातून नेपाळ येथून थेट जळगाव विमानतळावर आणण्यात येऊन तदनंतर त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील व शासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उर्वरित पर्यटकांना गोरखपूर रेल्वे स्थानक उत्तर प्रदेश येथून "गोरखपूर भुसावळ " या रेल्वेच्या माध्यमातून जळगांव, महाराष्ट्र येथे येण्याकरिता विशेष बोगीची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मृतदेह जळगाव या ठिकाणी आणण्याकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष हे नेपाळ मधील भारतीय दूतावास, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकार व भारतीय वायु सेना यांच्या सातत्याचां संपर्कामुळे प्रशासकीय बाबींची वेळेवर पूर्तता करता आली, यासाठी वरील विभाग २४ तास तत्पर असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी
सांगितले. दरम्यान सदर घटनेबाबत मंत्री अनिल पाटील यांनी वरणगाव येथे जाऊन मृतकांच्या नातलगांचे सांत्वन करीत झालेल्या घटनेबाबत दुःखही व्यक्त केले.