अमळनेर पंचायत समितीतील घरकुल विभाग सध्या भ्रष्टाचारात आघाडीवर

लाभार्थ्यांची होतेय आर्थिक पिळवणूक

प्रत्येक कामाचे ठरलेलं आहे दर पत्रक

अमळनेर : पंचायत समितीतील घरकुल विभाग सध्या भ्रष्टाचारात आघाडीवर आल्याचे दिसून येत आहे. घरकुल मंजुरी, पहिला हप्ता, दुसरा हप्ता व नंतर GPS फोटो काढण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांचे सुद्धा रेट ठरलेले आहेत. मंजुरीसाठी ग्रामसेवक / सरपंच यांना हडूक फेकाव लागतं, तर यातच या भ्रष्टाचाऱ्यांचे मन भरत नाहीये म्हणून ते आता दुसऱ्या हप्त्याला सुद्धा शिफारस मागून लाभार्थ्यांना मानसिक त्रास देत त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. लाभार्थी दुसऱ्या हप्त्याची शिफारस घ्यायला गेला की परत त्याकडे आर्थिक मागणी केली जाते. मात्र जर घरकुल मंजुरीच्या वेळेस शिफारस दिलेली असते तर मग पुन्हा दुसरा हप्ता देण्यासाठी शिफारसीचा अट्टाहास कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो. आधीच घरकुलची रक्कम खूपच कमी असते, 120 हजारांमध्ये कोणते घर बांधले जाते ? आणि जर कोणी बांधून दिले तर तो व्यक्ती शाबासकी लायक असेल. आणि मात्र जर बांधलं जात नसेल तरी त्या 120 हजारांमधून सर्व यंत्रणा मिळून लाभार्थ्यांकडून 10 ते 12 हजार बडकवतात हे कितपत योग्य म्हणावे ?

ठरलेले रेट…

घरकुल मंजुरी – 2 हजार ते 7 हजार (प्रत्येक गावाचा वेगवेगळा)

GPS सिस्टीम नुसार फोटो घेणे – 500 रुपये (प्रत्येक ठिकाणी)

पहिला हप्ता (15 हजारांचा) – यापैकी काही ठिकाणीच 500 ते 2000 रुपये मागणी

दुसरा हप्ता (45 हजारांचा) – शिफारस हवी असल्यास मागणीप्रमाणे देणे.

अमळनेर पंचायत समितीत अनेक वर्षांपासून पूर्णवेळ गट विकास अधिकारी नाहीये. म्हणूनच की काय अशी मुजोरी वाढली असावी…

प्रशासनाने हे सर्व थांबवून तात्काळ लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी हीच अपेक्षा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *