कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पीक विम्यासंदर्भात बैठक संपन्न

पिक विम्याची रक्कम वितरीत करण्याबाबत कृषीमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी दिले आदेश

अमळनेर: १८ सप्टेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ना.अनिल भाईदास पाटील यांनी पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतकरी बांधवांना याबाबत ताबडतोब मा.कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने आज दिनांक २१सप्टेंबर रोजी मंत्रालयात राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर विषयांवर सविस्तर बैठक संपन्न झाली.

यामध्ये सन २०२२-२३ या वर्षासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी पिक विम्याची रक्कम अद्याप शेतक-यांना मिळाली नसल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी मधील शास्त्रज्ञ यांनी गुगल मॅपिंगच्या डाटाची पडताळणी करुन या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्राचा अहवाल 10 दिवसात सादर करुन पात्र शेतक-यांना केळी पिक विम्याची रक्कम वितरीत करण्याबाबत आदेश कृषीमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी दिले.

तसेच जळगाव जिल्ह्यातील एकूण २७ मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसाचा खंड दिला असल्याने त्या भागातील पिकांचे उत्पन्न कमी येणार असल्याबाबत चर्चा झाली व सबंधीत शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरत असल्याने जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, भालोद, बामणोद, रावेर, खानापूर, निंभोरे बु., अंतुर्ली, अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगांव, पातोंडा, शिरुड, वारडे, बहाड, चाळीसगाव, हातले, खडकी बु., मेहूणबारे, शिरसगांव, तळेगाव, भडगाव, कजगाव, कोळगाव, धरणगांव, सोनवद बु. या मंडळातील शेतक-यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषीमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी दिले.

सदर बैठकीसाठी ना.अनिल भाईदास पाटील
मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य  समवेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी आयुक्त, पिक विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.