नामदार अनिल पाटलांचे प्रयत्न,सुमारे 17 कोटींचा निधी,अनेक गावांना जोडणारा शॉर्टकट मार्ग
अमळनेर -मतदारसंघात ग्रामिण भागातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी दोन्ही मिळून सुमारे 17 कोटींचा निधी मंजूर झाला आहे,अनेक गावांना जोडणारा हा शॉर्टकट मार्ग आता चकचकीत व विस्तीर्ण होणार असल्याने ग्रामिण जनतेची मोठी सोय होणार आहे.
महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी अनेक रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यात अमळनेर मतदारसंघातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश झाला आहे, याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन आदेश दि 13 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे.यात अमळनेर मतदारसंघातील प्रजिमा-5 (दहीवद) ते नगाव रस्ता -साखळी क्रमांक 000 ते 4/660,4/760 ते 5/650 (LR 09,VR 35) या 5.50 किमी रस्त्यासाठी 471 65 लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे.तर सडावन-हेडावे-पळासदळे- कुहे खु, बु, नगाव खु, बु, – धुपी-पिळोदा-गांधली-मेहरगाव ते पिंगळवाडे(भाग लांबी हेडावे,पळासदडे,कुर्हे खु बु,नगाव खु बु,धुपी पिळोदा गांधली ते मेहेरगाव) या 14.530 किमी रस्त्यासाठी 1221.75 एवढा निधी मंजूर झाला आहे.
वरील दोन्ही रस्ते म्हणजे परिसरातील अनेक गावांना जोडणारे तसेच शहरात जाण्यासाठी देखील अंतर कमी करणारे शॉर्टकट रस्ते असून या रस्त्यांची दर्जोन्नती होत असल्याने ग्रामिण जनतेला अत्यंत सोईचे होणार आहे.
मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे या रस्त्यांची कामे मार्गी लागली असून सदर मंजुरी बद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व ना अजित पवार ,ग्रामविकासमंत्री ना गिरीश महाजन,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले असून ग्रामिण जनतेचे देखील नामदार पाटील यांचे आभार मानले आहेत.