ईरशाळवाडी येथे दरड कोसळून अद्याप शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान देण्याचा घेतला निर्णय : मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि.८: मौजे चौक मानवली तालुका खालापुर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भूस्खलन होवून दरड कोसळली होती. या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशी च्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसाना 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपये इतकी रक्कम वाटप करनेकामी मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री श्री.अनिल पाटील म्हणाले, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती राहत होते त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून वरील दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी 27 व्यक्तींचे मृतदेह सापडलेले आहेत तर उर्वरीत 57 व्यक्ती बेपत्ता आहेत.प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थीती विचारात घेवून 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोध कार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तीच्या वारसाना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसाना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील उर्वरीत ७ मयत व्यक्ती आणि ५७ बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. सदर निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे आजच पत्रक शासनातर्फे काढण्यात आले आहे असे मंत्री श्री.पाटील म्हणाले.

[democracy id="1"]