धार्मिक कार्यासोबतच जोपासली जाते सामाजिक बांधिलकी
अमळनेर: येथील मंगळ ग्रह सेवा संस्था धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी सातत्याने जोपासते आहे. संस्थेने धुळ्याच्या दहा क्षयरोग रुग्णांना सहा महिन्यासाठी मोफत पोषक आहाराचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे मनपाच्या केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना आहाराचे वाटप झाले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानार्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पोषण व इतर आवश्यक मदत देण्याकरीता स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, उद्योग समुह, बँक व विविध संस्था आदींना मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे धुळे शहरातील दहा क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी गहु ३ किलो, शेंगदाणे अर्धा किलो, गुळ १ किलो, तेल १ किलो, तांदुळ ३ किलो, मठ १ किलो, मुग १ किलो असा पोषण आहार दिला जाणार आहे.
*पहिल्या महिन्याचा आहार वाटप
महापालिकेच्या क्षयरोग केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळग्रह सेवा संस्था संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम होते. खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी मनोहर तायडे, गोटू रणदिवे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.जे.सी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णाना पहिल्या महिन्याचा पोषण आहार देण्यात आला. यासाठी मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपायुक्त विजय सनेर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्रिती कुलकर्णी, शशिकांत कुवर, सुहास वसावे, अनिल बागुल, प्रकाश देवरे, योगेश मोरे, रविंद्र भामरे उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. जे. सी. पाटील यांनी २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत अभियानाचे महत्व सांगुन क्षयरोग विभागातील कामकाजाबाबत विश्लेषण केले. निक्षय मित्र या उपक्रमात समाजातील विविध घटकांना सक्रिय सहभाग नोंदवुन क्षयरुग्णांना सामाजिक आधार द्यावा असे आवाहन केले.