सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या परिसरातच होतायत चोऱ्या

अमळनेर: शहरात व तालुक्यात डीवायएसपी राकेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार लोकसहभागातून ७० ते ८० टक्के भागात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र अजूनही काही भाग हा कॅमेरे विरहीत आहे, नेमके चोरट्यांची नजर त्याच भागावर आहे ज्याठिकाणी अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित झालेले नाहीत. ‘ अटकाव न्यूज ’ने गेल्या दिड महिन्यातील झालेल्या चोऱ्यांच्या आढावा घेतला असता अशाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत ज्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
गुन्हेगारी कमी व्हावी या उद्देशाने पोलीस विभागातील मनुष्यबळाचा अभाव पाहता डीवायएसपी राकेश जाधव यांनी लोकसहभागातून उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संकल्पना अमलात आणली आहे. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत स्वेच्छेने लोकवर्गणी जमा करत आपापल्या परिसरात कॅमेरे बसवून घेतले आहेत. याचेच फलित म्हणून ज्या भागात कॅमेरे बसविले आहेत त्याठिकाणी चोरी, घरफोडी आदी घटनांना आळा बसला आहे. ढेकु रोडवरील शास्त्री नगर तसेच गलवाडे रोडवरील प्रताप मिल कंपाऊंड या भागात नेहमी चोºया, घरफोड्या व्हायच्या, मात्र राकेश जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तेथील नागरिकांनी एकत्र आले आणि लोकवर्गणीतून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. जेव्हापासून या परिसरात कॅमेरे बसविले आहेत, तेव्हापासून अर्थात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून या भागात एकही घरफोडी झालेली दिसून येत नाही.
मात्र काही परिसर अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे विरहित आहे. चोरटे नेमके अशाच परिसरात चोºया करताना दिसत आहेत.

पाटील कॉलनीत भरदिवसा दीड लाखाची चोरी
भगवा चौक परिसरातील पाटील कॉलनीत असलेल्या प्रभूरंग रेसिडेन्सीत सोने व रोख रक्कम असा दीड लाखाचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना ७ रोजी भरदिवसा घडली. प्रभूरंग रेसिडेन्सीमध्ये राहणारे दीपक जगन्नाथ सूर्यवंशी हे ७ रोजी दुपारी लग्नानिमित्त कुटुंबासह पैलाड परिसरात गेले होते. तेथून दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची आई घरी परत आली असता त्यांना घरात कपाट फोडलेले व तेथील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून ३५ ग्रॅम वजन असलेली ८० हजार ५०० रुपयांची सोन्याची माळ, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, साडे सहा ग्रॅम सोन्याचा दागिना, आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

नागरिकांनी लोकसहभागाला प्रतिसाद देत लोकवर्गणीच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना झालेली आहे. ज्याठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, त्याठिकाणी चोरी, घरफोडी आदी घटनांना आळा बसलेला दिसून येत आहे. मात्र ज्याठिकाणी कॅमेरे अद्यापही बसलेले नाहीत, त्याच ठिकाणी चोरीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. याचा अर्थ चोरटे त्याच भागावर लक्ष केंद्रित करत आहेत ज्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसलेले नाहीत. म्हणून मी जनतेला आवाहन करतो की, आपल्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, जीवितास धोका पोेहचू नये म्हणून लोकसहभागातून उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. कॅमेरे बसविल्याने एकप्रकारे २४ तास तिसºया डोळ्याची नजर आपल्या परिसरावर राहिल. जेणेकरून आपापल्या परिसरात अशा घटनांना आळा बसेल.
-राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर

[democracy id="1"]