अमळनेर:खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ.ए.बी.जैन यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.ए.बी.जैन हे प्रताप महाविद्यालयात व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक या पदांवर मागील ३६ वर्षांपासून कार्यरत असून खानदेश शिक्षण मंडळाचे ते विद्यमान सेक्रेटरी आहेत.त्यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स सायन्स या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले असून क.ब.चौ विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.यासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ स्तरीय अशा विविध ४३ चर्चासत्रात भाग घेतला असून ११ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.पुढील २ वर्षासाठी त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.ए.बी.जैन हे तालुक्यातील पिंपळे बु.येथील रहिवाशी त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.अमळनेर गोशाळा,समस्त जैन संघ,भारतीय जैन संघटना,ओसवाल जैन संस्था,भारतीय संस्कृती संवर्धन केंद्र(शिवधाम),श्री पाश्र्व कुशल शांतीधाम(निमगुळ),श्री पाश्र्व पद्मावती चॅरिटेबल ट्रस्ट(धुळे), अखिल भारतीय फलोदी जैन संघ (रायपूर),सम्राट संप्रती आर्य शिल्प शाळा (चेन्नई), श्री श्रेयस्कर जैन एकता सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट(आर्वी), श्री वासुपूज्य भगवान जैन मंदिर व दादावाडी संस्थान(अमळनेर) अशा वेगवेगळ्या संस्थांच्या विविध पदांवर ते आजही कार्यरत आहेत.
त्यांना लायन्स क्लब तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने तसेच राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्यातर्फे माझी वसुंधरा मित्र पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.
प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनदंन होत आहे.