अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस जन्मठेप.

अमळनेर: पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी रवींद्र श्यामराव पाटील (वय 39, पारोळा तालुका) यास बुधवारी न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अमळनेर न्यायालयात न्या.एस.बी.गायधनी यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले होते.

पीडितेची आई बाहेरगावी गेल्यानंतर अत्याचार


पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर आरोपी रवींद्र श्यामराव पाटील याने दारूच्या नशेत अत्याचार केला होता. फेब्रुवारी 2020 ते जुलै 2020 दरम्यान तसेच 13 फेब्रुवारी 2020 रोजी पीडितेची आई ही लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिवाय याबाबतची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची व स्वतः मरून जाण्याची धमकी दिली होती. आरोपीकडून छळ असह्य झाल्याने पीडितेने पारोळा पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा


या खटल्यात सरकारी वकील ऍड.किशोर आर.बागुल, मंगरूळकर यांनी
11 साक्षीदार तपासले. त्यात पीडितेच्या साक्षीसह सरकारी पंच व पीडितेची आई व डॉ.विद्येश जैन, डॉ.सुप्रिया खांडे, डॉ. गणेश पाटील यांची साक्ष व तसेच न्यायवैज्ञानिक विभाग, नाशिक यांचेकडील डी.एन.ए व रक्त तपासणी अहवाल महत्वाचा ठरला. तपासी अधिकारी रवींद्र बागुल यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहातच आहे. दरम्यान, खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंके व हिरालाल पाटील, अमळनेर यांनी काम पाहिल्याची माहिती सहायक सरकारी वकील के.आर.बागुल यांनी दिली.