अंमळनेर पं.स.चे अधिकारी व धार ग्रा.पं.चे ग्रामसेवक मारताय दांडी आणि नागरिकांची कोंडी

अमळनेर पंचायत समितीसह धार ग्रामपंचायत वाऱ्यावर
तक्रारदारांना कोण देणार न्याय ????

अमळनेर : तालुक्यातील धार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या काही दिवसांपासून दांडी मारून गायब असल्याचे एका तक्रारीतून समोर आले आहे. तर तक्रारदार त्या ग्रामसेवकाची तक्रार देण्यासाठी पंचायत समिती अमळनेर येथे आले असता पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी देखील उपस्थित नसल्याने अमळनेर पंचायत समितीसह धार ग्रामपंचायत देखील वाऱ्यावर असल्याचे चित्र समोर आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, धार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कमलेश निकम हे गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीत गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची दाखले, घरपट्टी , नळपट्टी भरण्यास गैरसोय होत होती. सध्या मार्च एंड सुरु असून कर भरण्याची धुमाळी अनेक ठिकाणी सुरु आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो व कर हा त्याच्याकडे भरावा लागतो मात्र सचिव उपस्थित नसल्याचे कर कुठ भारावा असा प्रश्न देखील ग्रामस्थांना भावतो आहे. कारण धार ग्रामपंचायत हि तालुक्यातील बड्या ग्रामपंचायतीतील एक आहे. तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा कणा समजला जातो. परंतु या धार ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच उपस्थित राहत नसल्याने तसेच नागरिकांचे फोन घेत नसल्याने, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर उमटत आहे म्हणून काही नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे आले. मात्र तक्रार देण्यासाठी धार येथील नागरिक दीपक आधार सैंदाणे हे पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे गट विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार करायला गेले असता ते देखील कार्यालयात नसल्याने तक्रारदार हे सहायक गट विकास अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यास गेले. मात्र सहायक गट विकास अधिकारी देखील त्यांच्या दालनात नव्हते. तेव्हा मात्र ते वैतागून विस्तार अधिकारी तरी आपल्याला न्याय देतील या आशेने त्यांच्या कडे गेले परंतु विस्तार अधिकारी देखील उपस्थित नसल्याचे त्यांनी शेवटी नैराश्याने टपालात अर्ज दिला आणि शेवटी अटकाव न्युज कडे आपली धाव घेतली आहे.

म्हणून अमळनेर पंचायत समितीचे सध्याचे कारभारी सध्या कुठे आहेत या बाबत विचारणा करण्यास अटकाव न्यूज पंचायत समिती येथे गेले असता तेथील उपस्थित कर्मचारी यांना देखील या बाबत सांगता आले नाही. म्हणून या मुजोर अधिकारी, ग्रामविकास अधिकारी – कर्मचारी यांच्यावर नेमका अंकुश कुणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय.

अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे कायम शुक्रवारी दांडी मारत असतात. म्हणजे शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सुट्टी असल्याने ते अमळनेर मधील एका नामांकित हॉटेल/ बार मध्ये मौज करीत असतात. तर अनेक ग्रामसेवक हे अमळनेर पासून मैलो दूर राहत असल्याने त्यांच्या राहत्या गावी निघून जात असतात. तशीच काहीशी परिस्थिती कमलेश निकम या ग्रामसेवकाची आहे. हा ग्रामसेवक नासिक येथे वास्तव्यास असल्याने तेथून अमळनेर येथे ये-जा करीत असतो. म्हणून हा ग्रामसेवक व इतर ग्रामसेवक हे शुक्रवार पासूनच गायब होण्याचा नित्यक्रम जणू ठरलेलाच आहे असे वागत असतात . म्हणून अशा ग्रामसेवकांना कामावरून मुक्त करून कायमचे घरी पाठवावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रीक यंत्रणा बसून यांच्यावर वचक आणावी….

तर अमळनेर गट विकास अधिकारी यांचा जर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक नसेल तर त्यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवावे जेणे करून गट विकास अधिकारी पुन्हा अभ्यास करून कामावर हजार होतील. अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे.