
अमळनेर (अटकाव न्यूज ):
अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे मानधन गेल्या सात महिन्यांपासून थकले असल्याने, याचा गंभीर परिणाम दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा महिला व निराधार लाभार्थ्यांच्या जीवनावर होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार राजेंद्र रामदास ढोले यांना निवेदन सादर करत मानधन तात्काळ वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनाद्वारे, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांची केवायसी पूर्ण असूनही खात्यावर रक्कम जमा न होणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून माहिती न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.
तहसील कार्यालयात वारंवार येऊन चौकशी करणाऱ्या लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांची गैरसोय व मानसिक त्रास वाढला आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना औषधे, अन्नधान्य, प्रवास आदी जीवनावश्यक गरजांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
यासोबतच, योजना लाभांविषयी माहिती दर्शक फलक कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागांशी समन्वय साधून थकीत व नियमित मानधन तात्काळ बँक खात्यांमध्ये जमा करण्यात यावे, अशी विनंती निवेदनकर्त्यांनी केली.
या प्रसंगी स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरीचे अध्यक्ष मौलाना रियाज़ शेख, तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे, विनोद जाधव, रामेश्वर तांडा, कमर दादा, सुरेश चव्हाण, कैलास पवार, भुरा जाधव, नारायण भाऊ, प्रमिला पाटील, नुरखा पठान, चतुर पवार, आशा बाई पाटील आदींसह मोठ्या संख्येने वयोवृद्ध, दिव्यांग व विधवा महिला लाभार्थी उपस्थित होते.
संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन मानधन वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून जोरदारपणे करण्यात आली.









