अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगांव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
दि.३१ जुलै २०२४ रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगांव जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा
अमळनेर:( अटकावं न्यूज)  एकात्मिक बालविकास सेवा योजनेत जिल्ह्यासह राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका गेली अनेक वर्षे काम करीत आहेत.गेली अनेक वर्षे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी संप,मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार आंदोलने करीत आहेत.
अनेकदा मुंबईत मंत्रालय,सचिव आणि आयुक्त कार्यालय पातळीवर बैठका होवूनही त्यांच्या मागण्यांकडे शासनाने सततपणे दुर्लक्ष केले आहे म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आशा स्वयंसेविकांच्या धर्तीवर ठरल्याप्रमाणे मानधनात भरीव स्वरूपाची वाढ देण्याचा निर्णय विधानसभा निवडणुक आचासंहितेपूर्वी घेण्यात यावा तसेच सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा,मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, मुख्यसेविका (पर्यवेक्षिका),सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे तात्काळ भरावीत,गणवेश आणि सादील खर्चात वाढ करावी,अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन लागू करून मागील फरकाची रक्कम देण्यात यावा, मोबाईल रिचार्जची रक्कम वाढविण्यात यावी,नागरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे सुधारित भाडे लागू करावे, अंगणवाडी कर्मचारी यांचे बदलीबाबत धोरण ठरविण्यात यावे.मिनी अंगणवाडी केंद्रात मदतनीसांची पदे तात्काळ भरण्यात यावी.
यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.३१ जुलै २०२४ रोजी जळगांव जिल्हा परिषदेवर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे.
तरी जळगांव जिल्हयातील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनी सदर दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) जळगांव येथे एकत्र जमावे.
मोर्चाला येतांना सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनी काळी छत्री सोबत आणून गणवेशात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून छत्री मोर्चा यशस्वी करावा.
असे आवाहन रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह श्रीमती मिनाक्षी चौधरी,मंगला नेवे,चेतना गवळी,सविता महाजन,शोभा जावरे,शकुंतला चौधरी,रेखा नेरकर,सुनंदा नेरकर,रेखा गवारे,पुष्पा परदेशी,कल्पना जोशी,साधना पाटील,सरला पाटील,आशा जाधव,निता सुरवाडे,संगिता निंभोरकर,शुभांगी बोरसे,उज्वला पाटील,सुलोचना पाटील,नंदा देवरे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]