अमळनेर (योगेश पाने ) – वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असे प्रामुख्याने तीन प्रकार असतात आयुर्वेदिक भारताचे प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. त्यानंतर ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी आली. आज पासून 50 ते 60 वर्षापूर्वी आयुर्वेद उपचार करणारे बहुसंख्य वैद्य होते. ॲलोपॅथीही होती. ॲलोपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर्स होते. परंतु आयुर्वेद व ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे बोटावर मोजण्या इतके डॉक्टर्स होते. त्यापैकी एक होते कै. डॉ. सदाशिव शंकर उर्फ राजाभाऊ चितळे. (GFAM) GFAM Graduate Faculty of Ayurveda & Allopathy Combine Graduation हे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी अंमळनेरातच प्रॅक्टिस सुरू केली होती. येथील राणी लक्ष्मीबाई चौकात (पाचकंदील) भागात समोरील साठे बिल्डिंगमध्ये त्यांचे क्लिनिक होते. त्यांचे क्लिनिक अत्यंत साधेसुधे स्वच्छ असे. विशेष म्हणजे एका रुपयात ते औषधी व इंजेक्शनही देत होते. गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून अमळनेर शहरात व तालुक्यात ते सुप्रसिद्ध होते. गोरगरिबांचे डॉक्टर्स हा मान फार कमी डॉक्टर्सना प्राप्त झाला होता. त्यात सर्वश्री डॉ. मोने, डॉ. ए. आर. सेन, डॉ. कालिदास वैद्य, डॉ. सातभाई, नाना वैद्य, डॉ. जवंजाल, डॉ. सुभाष भसाळे, डॉ. बी आर बडगुजर, डॉ. आप्पासाहेब म्हस्कर, डॉ. बी आर बाविस्कर आदींचा समावेश आहे. राजाभाऊंचे बंधू मधुकर चितळे हे देखील बडोदा येथील सुप्रसिद्ध Occupational Therapist होते. राजाभाऊंचा जन्म 16 नोव्हेंबर 1933 व मृत्यू 28 जून 1978 सालचा. त्यांना उणी-पुरी 48 वर्ष मिळाली. त्यात 21 वर्ष त्यांनी रुग्णसेवा केली. त्यादरम्यान त्यांनी जनसामान्यात एक आगळीवेगळी प्रतिष्ठा मिळविली होती. आज त्यांच्या मृत्यूला 44 वर्षे झालीत, तरीही जुने अमळनेरकर त्यांना विसरलेले नाहीत.
डॉ. राजाभाऊ चितळेनी अंमळनेरात पहिली ब्लड बँक त्याकाळी सुरू केली होती. जे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी येत असत त्यांना ते उत्तम प्रकारची वागणूक देऊन उत्तम प्रतीचा नाश्ताही स्वतःच्या स्वखर्चाने देत होते. तसेच ते पॅथॉलॉजीची ही प्रॅक्टिस करीत होते. त्यांचे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट अचूक असायचे. त्यांचे राहते घर न्यू प्लॉट भागातील शनी मंदिर गल्लीत होते. एक टुमदार बंगला त्यांचा होता. न्यू प्लॉट ते पाचकंदील चौक ते नेहमीच सायकलीने जात असत. सायकलीच्या मागील कॅरिअरवर त्यांची वैद्यकीय सामानाची बॅग असायची. आमचा साप्ताहिक लोकमानस हा पेपर नेहमी त्यांच्याकडे येत असे. माझे पिताश्री पत्रकार कै. माधवरावजी सुतार व डॉ. चितळे यांचा खूप घनिष्ठ मैत्रीचा संबंध होता. त्यांचे आमच्या देशमुख गल्लीतील निवासस्थानी नेहमीच येणे-जाणे होत असे. डॉक्टरांची मोठी सुकन्या मीरा चितळे हि माझ्या कॉलेजमधील वर्ग मैत्रीण. चितळे कुटुंबाच्या अति आग्रहामुळे राजाभाऊंनी नवीन लुना विकत घेतली होती.
डॉ. चितळेंना पत्नी मंगलाताई चितळे, दोन मुली सौ मीरा चितळे – केळकर (पुणे), महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ. सुहासिनी चितळे-नांदगावकर (मुंबई), श्री विवेक चितळे (मुंबई) असा छान व सुंदर परिवार होता. राजाभाऊंना शास्त्रीय संगीत व लॉन टेनिस या खेळांची अगदी मनापासून आवड होती. त्यांना त्यावेळी शास्त्रीय संगीत शिकविण्यासाठी धुळ्याहून श्री नाशिककर गुरुजी हे खास येत असत. विवेक चितळे हे छान पैकी तबला व हार्मोनियम वाजवीत असत. आणि मंगलाताई या उत्तम गायिका होत्या त्यामुळे त्यांच्या दोघीहि मुली मीरा व सुहासिनी चांगल्या प्रकारच्या गायिका झाल्यात. सुहासिनीने तर कमालच केली, तिने लहान वयातच अंमळनेरची लता मंगेशकर ही पदवी रसिकांकडून मिळविली होती. ती महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार शांतारामजी नांदगावकरांची स्नुषा आहे. ती आज मुंबई, पुण्याच्या जाहीर कार्यक्रमात संगीत मैफिली गाजवित आहे. कै.डॉ.राजाभाऊ चितळेंना गाण्याचा वारसा चालवणारी, सुरांची उत्तम जाण असणारी गोड गळ्याची सून संगीता मिळाली, जी चितळे घराण्याची शानच जणू..! सौ संगीताने 2008 साली झी मराठी सारेगमपची महागायिका होण्याचा मान मिळाला. सौ मीरा चितळे-केळकर या दैनिक सकाळ वृत्तपत्रात जाहिरात विभागात कार्यरत होत्या. तर सुहासिनी चितळे – नांदगावकर या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका आहेत आणि श्री विवेक चितळे हे मुंबईतील आघाडीचे इस्टेट ब्रोकर आहेत. आज जर राजाभाऊ हयात असते तर त्यांची छाती खऱ्या अर्थाने 56 इंची झाली असती. कै. राजाभाऊंच्या पश्चात श्रीमती मंगलाताई चितळेंनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सतत मार्गदर्शन, प्रेरणा व आशीर्वाद दिलेत. संगीत हा चितळे कुटुंबाचा श्वास होता.
अमळनेरातील टाऊन हॉल क्लब हा ब्रह्मे कुटुंबांचा सांस्कृतिक वारसा होता. त्यावेळी शहरातील अनेक नामवंत डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, प्राध्यापक, व्यापारी, न्यायाधीश, पत्रकार इत्यादी या ठिकाणी एकत्र येत असत आणि लॉन टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, बिलियर्ड खेळत असत. अमळनेरात लॉन टेनिसची सुरुवात सुमारे 75 वर्षापूर्वी कै. ॲड. बापूसाहेब मो. द. ब्रम्हे, (माजी जनरल सेक्रेटरी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी) यांनी केली होती. त्याच बापूसाहेब ब्रह्मेंच्या शुभहस्ते दगडी दरवाज्यावर दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री बारा वाजता स्वातंत्र्याचे पहिले झेंडावंदन झालेले होते. त्या ऐतिहासिक टाउन हॉल क्लबचे राजाभाऊ चितळे सभासद होते. राजाभाऊ चितळे निष्णात डॉक्टर, उत्तम संगीत प्रेमी, उत्तम लॉन टेनिस खेळाडू होते. अनेक वेळा पैजा लावून त्यांनी टेनिसचे सामने जिंकलेले आहेत. ते त्याकाळी बाहेरगावी ही टेनिस सामने खेळावयास जात असत. त्यांची मोठी मुलगी मिरा चितळे ही देखील उत्कृष्ट बास्केटबॉलपटू आहे. राजाभाऊ सोबत टेनिस खेळणारे त्यांची समकालीन खेळाडू होते सर्वश्री केदार ब्रम्हे, रामा कोळी, अजितसिंग कालरा, रविंद्रसिंग कालरा, भरतभाई शहा, किर्तीकुमार शाह (बाळू काका), बजरंग अग्रवाल, प्रा.अशोक भालेराव, प्रकाश भांडारकर, भास्करअण्णा पाटील आदींचा समावेश होता. टेनिस खेळावर त्यांचे मनापासून प्रेम होते.
सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक ध्यानीमनी नसताना राजाभाऊंना ब्लड कॅन्सर झाला. या घटनेने त्यांचे कुटुंब हादरूनच गेले. त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे सहकारी डॉक्टर्स, रुग्ण व राजाभाऊंवर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतकांसाठी ही फारच शॉकिंग न्यूज होती. त्यावेळी ब्लड कॅन्सरचा इलाज भारतात होत नव्हता. त्यासाठी परदेशात जाणे भाग होते. त्यावेळी अमळनेरकर राजाभाऊंच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. अमळनेरकरांनी वैद्यकीय उपचार व्हावेत म्हणून साठ हजार रुपयांचा मदत निधी जमा करून राजाभाऊंना दिला होता. परंतु नियतीने आपला डाव अचूक साधला आणि दिनांक 28 जून 1978 रोजी राजाभाऊंनी या जगाचा निरोप घेतला. चितळे कुटुंबावर हा मोठा आघातच होता. हजारो अंमळनेरकरांच्या साक्षीने अंमळनेरच्या अमरधाममध्ये त्यांना साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना दिली. अमळनेरमध्ये श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या अंतयात्रेनंतर मोठी डॉ. चितळे यांचीच अंतयांत्रा होती. हिच त्यांच्या जनमानसात लोकप्रियतेची पावती आहे. अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाला आम्ही अंमळनेरकर विसरुच शकलो नाही. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक असलेल्या डॉक्टर राजाभाऊ चितळेंना आम्ही अमळनेरकर भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि अमळनेरकर कायमस्वरूपी चितळे परिवाराच्या पाठीशी आहोत ही ग्वाही देतो.!!
जय हिंद जय महाराष्ट्र….
*सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.