अमळनेर :येथील धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेस महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महासमारोहात हा पुरस्कार वितरीत होईल.
समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने नेहमी सामाजिक जाणीवेचे उचीत भान ठेऊन धार्मिकतेबरोबरच शिक्षण, कृषी, पर्यावरण, आरोग्य आदी क्षेत्रातही मंगळ ग्रह सेवा संस्था अविरत कार्य करत आहे.
या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. त १२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व २५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणे करुन सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार / समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केलेली आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यानुषंगाने सदर पुरस्कारासाठी गठीत केलेल्या मा. मुख्यमंत्री तथा मा. मंत्री, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या चार वर्षांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थांची वर्षनिहाय निवड करण्याची बाब विचाराधीन होती.
त्यानुसार यंदा हा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील दहा संस्थांमध्ये मंगळ ग्रह सेवा संस्थेचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व विश्वस्त मंडळाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.