कोजागरीच्या दुधात मामीने टाकला मिठाचा खडा!
महिला अन्याय विरोधी समितीने शिकविला धडा!

अमळनेर: आपल्या कडे आश्रयास राहून शिक्षण घेऊन मोठ्या झालेल्या भाच्याचे यश सहन न झाल्याने जळणाऱ्या वैफल्यग्रस्त मामीने भाच्याच्या नियोजित वधूच्या मनात विष पेरून चक्क साखरपुडा मोडला.
नियोजित वधूचे कान भरले गेल्याने अत्यन्त उत्साहात लग्नबंध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नियोजित वधु मेधाने भर कार्यक्रमात मला साखरपुडा करायचा नाही म्हणत सर्व नातलगा समोर अमळनेरकर संजयचा पाणउतारा केला. अनेकांनी समजावले तरी नकारच देणाऱ्या जळगाव येथील मेधाला नक्की संजय बद्दल काय समजले? या बाबत साशँक संजयचे आयुष्याचा प्रश्न असल्याने त्याने अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांना संपर्क केला.. गंभीर प्रकरण असल्याने तातडीने दखल घेत धनंजय सोनार व सहकारी जळगाव येथे धावून गेले.
चर्चा व माहितीचा ताळमेळ जुळवताना मेधा व परिवाराची दिशाभूल केली गेली यात संजयच्या मामीचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले.
माझे कडे आश्रयास असलेला गरीब भाचा मोठा अधिकारी झाला व आम्ही श्रीमंत असून आमचे मुलं प्रगती करू शकले नाहीत ही जळाऊ वृत्ती या पाठीमागे असल्याचे लक्षात आल्याने समितीच्या पदाधिकारिनी सदर मामीचे समुपदेशन केले. पैसा सगळ्या लोकांकडे असला तरी त्यांची मुले मोठी होतातच असे नाही, लाडात वाढवली की दिशा चुकते गरीब घरातील मुलांना आपली परिस्थिती बदलावी ही चिंता सतावते व ते अभ्यास करतात.. विकास करतात यात जळण्या सारखे काही नाही, आपल्याकडे भाचा देव मानतात, त्या देवाबद्दल असे जळू नका असे समजावून सांगितले तेंव्हा वैफल्यग्रस्त मामीने मेधा व सर्व परिवाराची माफी मागितली. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून कोठेही वाच्यता न करण्याच्या बोलीवर विषयावर पडदा पडला.
सख्या भाच्याचे लग्न मोडायला निघालेल्या मामीने माफी मागून शब्द फिरविले. कोजागिरीच्या दुधात मिठाचा खडा टाकण्यात यशस्वी झालेल्या मामीने तिसऱ्या दिवशी प्रसन्न होत साखरपुड्यात मिरवून देखील घेतले.
अशा रीतीने कोजागरी ऐवजी 31 ऑक्टोबर 23 रोजी लग्नबंध अर्थात साखरपुडा संपन्न झाला.
समज गैरसमज निवळले. आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मेधा व संजय विवाह बंधनात गुंफले जाणार आहेत.
या कामी अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, अनिल एकनाथ चौधरी, मंगला विसपुते (भडगाव) निशा विसपुते, फौजदार बाळकृष्ण शिंदे, विनोद राऊळ, विनोद सोनवणे आदींनी पुढाकार घेऊन एक उध्वस्त होणारा संसार वाचविला. अकारण माझी प्रगती सहन न होणाऱ्या मामीचे मानसिक परिवर्तन केल्या बद्दल संजय व नियोजित वधू मेधा यांनी महिला अन्याय विरोधी समितीचे आभार मानले.
महिला अन्याय विरोधी समितीने आजवर अशा शंभरावर प्रकरणात समुपदेशन करून संसार जोडल्याच्या घटना आहेत. कोर्ट-कचेरी व वाद न वाढू देता सामंजस्य निर्माण करणाऱ्या धनंजय सोनार यांच्या महिला अन्याय विरोधी समितीचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *