इतिहास व गणित विषय एकमेकात गुंफले
अमळनेर: विद्यार्थ्यांना गणित विषयात पारंगत करायचं असेल तर विद्यार्थ्यांना आकडेमोड आली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची आकडेमोड चांगली त्या विद्यार्थ्याला गणित सोडवणे सोपे जाते. भल्या भल्यांना गणितातील आकडेमोड जमत नाही. त्यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सांगतावर्षा निमित्त शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांचे आकडेमोड कौशल्य विकसित केले .
वर्गातील मुलांना आकडेमोडीचे कौशल्य विकसित करण्यासाठी मुख्याध्यापक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि गणित हा प्रकल्प देण्यात आला होता. त्या अंतर्गत 1947 या स्वातंत्र्य वर्षाच्या अंकांचा उपयोग करून नैसर्गिक संख्या बनवण्याचा उपक्रम होता. सर्व विद्यार्थ्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे चिन्ह वापरून क्रमिक संख्या बनवायची होती. वर्गातील जवळजवळ सर्वच मुलांनी काही संख्या बनवल्या. परंतु विशेष नैपुण्य दाखवत यशमित खैरनार, जिज्ञेश पाटील,पराग पाटील, हर्षल पाटील या विद्यार्थ्यांनी क्रमाने 75 पर्यंत संख्या तयार केल्या आहेत. त्यामुळे वरील सर्व विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी दादासो रावसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष आबासो हेमकांत पाटील सचिव दादासो संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनिल पाटील सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी संख्या तयार केल्याबद्दल सेल्फी चा फंडा उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक तसेच विषय शिक्षक यांच्या समवेत त्यांचा फोटो घेण्यात आला. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास दुणावला. आपण काहीतरी केले तर वरिष्ठ आपली दखल घेतात हा संदेश आपसूकच विद्यार्थ्यांमध्ये गेला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः काहीतरी केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त अध्ययन अनुभूती घेतली. आकडेमोड करताना कसा क्रम घेतला पाहिजे व संख्या कशी तयार केली पाहिजे याची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्यांना आली. आनंददायी प्रकल्पाने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. आपल्या अध्ययनाला कृतिशील तिची जोड मिळाली तर अधिक परिणामकारक अभ्यास घडून येतो याची अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली. याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतः अध्ययन अनुभूती घेतली व आनंददायी शिक्षण मिळाले.