महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अमळनेर:( पाचोरा प्रतिनिधी): एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाचोरा मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी आणि आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्या दि.३१ मे २०२३ तसेच दि. १६ जून २०२३ रोजीच्या आदेशानुसार दोन दिवसात थकीत मानधन अदा करावे यासाठी प्रकल्प कार्यालयासमोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दि.२८ जून रोजी धरणे आंदोलन केले. परिणामी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जिजा राठोड यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन दि. २७ जुन रोजी बॅंकेत पाठविण्यात आल्याचे लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. तसेच गणवेश, सादिल खर्च, मोबाईल रिचार्ज बिल, प्रोत्साहन भत्ता, प्रवास भत्ते बिल यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी वरिष्ठ पातळीवर केली असल्याचेही लेखी उत्तरही प्रकल्प कार्यालयाने संघटनेला दिले. चर्चेत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जिजाबाई राठोड,संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह पुष्पा परदेशी,श्रीमती कल्पना जोशी, मनिषा कोठावदे,मंगला पाटील,अन्नपूर्णा पाटील,ललिता पाटील,संगिता पाटील,सुरेखा मगर यांनी भागिदारी केली. चर्चा सकारात्मक झाल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी जाहीर केले.