आज तब्बल १४ वर्षांनंतर खासदार शरद पवार साहेब अमळनेर भूमीत

अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज अमळनेर येथे रोड शो होणार आहे, तसेच त्यांच्या उपस्थितीत ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनही छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.
राज्यभरातून तब्बल १५०० प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधीमंडळ प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील, ग्रंथालय सेलचे राज्याध्यक्ष उमेश पाटील व राज्य समन्वयक सौ रिता बाविस्कर यांनी दिली.
आमदार अनिल पाटील यांनी सांगितले, की अमळनेर येथे ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शुक्रवारी होईल.अधिवेशनाचा प्रारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते होईल.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड,लेखक रावसाहेब कसबे,विजय चोरमारे आदी उपस्थित राहतील.यावेळी राज्यातील नऊ ग्रंथालयांना शरदचंद्र पवार उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. अधिवेशनाचा समारोप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येईल. पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले, की तब्बल १४ वर्षांनंतर खासदार शरद पवार अमळनेर भूमीत येत आहेत. खासदार शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड यांचा रोड शो सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून, तर ग्रंथालय सेल अधिवेशनापर्यंत होईल. जळगाव ते अमळनेर दरम्यान धरणगाव व टाकरखेडा येथे शरद पवार यांचा सत्कार होईल. शिवाय ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाचा समारोप झाल्यावर अमळनेर येथील प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणाऱ्या वादग्रस्त जागेस अजित पवार भेट देणार आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर खासदार शरदचंद्र पवार अमळनेर भूमीत येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून खासदार शरद पवार यांचे सोबत अजित पवार, जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड हे बडे नेते देखील असल्याने आमदार अनिल पाटील यांनी नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.अजित पवार व जयंत पाटील हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच रात्री अमळनेरात दाखल झाले असून हॉटेल मिड टाऊन येथे ते मुक्कामी होते,आज सकाळी आमदार अनिल पाटील तथा राष्ट्रवादी कार्यालयात ते उपस्थित होऊन तेथे जळगाव येथून शरद पवार उपस्थित झाल्यानंतर रोड शो ला सुरुवात होणार आहे.