थकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चा
अमळनेर: राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासूनचे थकीत देण्यासह नमूद प्रश्नांवर आज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांनी महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने अदा करून दरमहा पाच तारखेला मानधन मिळावे,
सेवानिवृत्ती नंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन लागु करण्यात यावी.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन आणि अद्ययावत तसेच दर्जेदार मोबाईल फोन पुरविण्यात यावेत,
सेवानिवृत्त झालेल्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा लाभ तात्काळ देण्यात यावा.
मुख्यासेविका भरती मध्ये अंगणवाडी सेविकांसाठी वयाची आणि शिक्षणाची अट शिथिल करावी.या मागण्या करण्यात आल्या.
यावर उपसचिव श्री. ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल महिन्याचे राज्य हिस्सा मानधनाची रक्कम प्रकल्प कार्यालयांकडे वर्ग करण्यात आली आहे. शासनाने केलेली मानधन वाढ एप्रिल २०२३ पासून लागू केली जाणार असून त्यासाठी लागणारा मंजूर करण्यात आला आहे तसेच मे २०२३ च्या मानधनाची रक्कम आयुक्त कार्यालय नवी मुंबई कडे वर्ग केली असल्याने लवकरच सदर मानधन अदा करण्यात येईल .अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल फोन येत्या तिन महिन्याच्या आत पुरविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सेवा समाप्तीच्या लाभाची रक्कम अदा होण्यासाठी एल.आय.सी. कडे पाठपुरावा सुरू असून प्रलंबित प्रस्ताव लवकरच मंजूर होतील. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव करण्यासाठी मंत्रालय पातळीवर लवकरच बैठक घेण्यात येईल तसेच मुख्यसेविका भरती लवकरच होणार असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सदर भरतीमध्ये वयाची आणि शिक्षणाची अट शिथिल करण्याचा मुद्दा शासनाच्या विचाराधीन आहे.अंगणवाडी केंद्राचे भाड्याची रक्कम प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग झालेली असल्याचेही श्री ठाकूर यांनी बैठकीत सांगितले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर मानधन देऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबवा अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
सदर बैठकीत उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्यासह संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मायाताई परमेश्वर,कक्ष अधिकारी श्री. जाधव उपस्थित असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी दिली.