महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल मतदार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद
अमळनेर:कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक २०२३-२८ महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा भव्य मतदार मेळावा आज दि.२५ एप्रिल २०२३ रोजी अंबिका मंगल कार्यालय, अमळनेर येथे पार पडला त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भूमिपुत्र आमदार दादासो.श्री.अनिल भाईदास पाटील, म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समितीत जनतेच्या आशीर्वादाने मी सभापती असताना मार्केटचे जे वैभव होते तेच गतवैभव आपण सहकार पॅनलच्या माध्यमातून विराजमान होणाऱ्या संचालक मंडळाद्वारे परत आणू अशी ग्वाही महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलच्या मेळाव्यात आ.अनिल पाटील यांनी जाहीरपणे दिली.
महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी प्रशासक सौ.तिलोत्तमा ताई पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला बळीराजा प्रतिमेचे पूजन करून प्रास्ताविक रामकृष्ण पाटील यांनी केले. मेळाव्यात बोलताना आ.पाटील म्हणाले की आमचा कोणताही उमेदवार अवैध धंदे करणारा नाही, कोणताही उमेदवार 5 हजार घेऊन मार्केटचे टोकन विकणारा नाही, कुणाच्या विश्वासाला तडा जाणार नाही हा आमचा शब्द असून, भविष्यात कुणी टोकन विकलेच तर मी स्वतः त्याला संपविल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांना जास्तीतजास्त भाव कसा मिळेल याचे नियोजन व प्रयत्न संचालक मंडळाने करणे अपेक्षित असते, गेल्या काळात मार्केटला टोकन घोटाळा झाला तेव्हा शेतकऱ्यांचे हाल काय झाले ते आपण अनुभवले आहेत. 5 हजार मध्ये टोकन विकून ज्यांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली त्यांना जोडे हाणले पाहिजे, मार्केटमध्ये आपल्याच नातलगांना किती दुकाने विकलीत तेही प्रश्न विचारले पाहिजेत. आमचे संचालक मंडळ विराजमान झाल्यास कोणाचीही कट्टी कापली जाणार नाही ही ग्वाही आहे असे सांगत संपूर्ण सहकार पॅनल विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले की साहेबराव दादाला काय ? काय ? झाले, कुठे गेलेत ? याची चर्चा नेहमी होत असते परंतु मी अनिलदादाला राष्ट्रवादीत नेले असून अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे, त्यांच्या प्रेमापोटी मी महाविकास आघाडी सोबतच असून आमच्या या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवाराना विजयी करा असे असे यावेळी बोलले तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार म्हणाले की एवढ्या मोठ्या संख्येने मतदार येथे आले असल्याने सहकार पॅनल शंबर टक्के विजयी होणार. चांगले पॅनल दोन्ही दादांनी दिले असून, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना पुढे उमेदवारी मिळेल हा माझा शब्द आहे. अनेर धरणावर अनेरच्या नावाखाली बाहेरचे मासे विकले जातात परंतु अमळनेरचे लोक आता हुशार झाले असून बाहेरचा मासा आणि आपला मासा ओळखायला लागले आहेत असा टोला मारत अनिल दादा व साहेबराव दादा सारखे सक्षम पावरफुल नेतृत्व महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलला असल्याने याच पॅनलला विजयी करा असे आवाहन सर्व मतदार बांधवांना त्यांनी केले.
यावेळी मंचावर सौ.सुलोचना ताई वाघ, सौ.रिता बाविस्कर, प्रा.सौ.मंदाकिनी भामरे, जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, विजू मास्तर, मुन्ना शर्मा, बी.के.सूर्यवंशी, श्याम पाटील, संजय पूनाजी पाटील तसेच पॅनलचे उमेदवार भोजमल मालजी पाटील, कृषिभूषण सुरेश पिरन पाटील, दिपक मणीलाल पाटील, अशोक आधार पाटील, प्रा.सुभाष सुकलाल पाटील, गोकुळ बोरसे, समाधान धनगर, सौ.सुषमा वासुदेव पाटील (देसले), सौ.पुष्पा विजय पाटील, डॉ.अनिल शिंदे, सचिन बाळू पाटील, प्रा.सुरेश विक्रम पाटील, , रामकृष्ण पाटील, महादू आना पाटील भाईदास सोनू भिल उपस्थित होते. महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलच्या मेळाव्यास मोठा मतदार राजा व जनसमुदायाच्या प्रतिसाद लाभला, यावेळी सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुभाष पाटील यांनी मानले.