अमळनेर: दि. 14/4/2023 रोजी मारवड, येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयातील “करिअर कट्टा” व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी ” करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी तर प्रास्ताविक करिअर कट्टा समन्वयक प्रा डॉ. माधव वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून क्रांतिवीर नवलभाऊ महाविद्यालय, नवलनगर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंदा बाबुराव सोनवणे हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व्हि. डी. पाटील यांनी भुषविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली.
तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आनंदा बाबुराव सोनवणे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्य व घटना निर्मिती प्रक्रिया, त्यांचे राजकीय व आर्थिक विचार सांगून त्यांनी दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. व्ही. डी पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांची भारतीय लोकशाही बद्दलची विचारसरणी, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही यावर भाष्य केले.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.