मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला:- डॉ. अनिल शिंदे
अमळनेर:- तालुक्यातील मारवड गाव व परिसरात अपेक्षित विकासकामे न झाल्याने तसेच सरकार विषयी असलेली शेतकऱ्यांची नाराजी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिंदे हेच आघाडीवर राहतील, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले. ४ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ धार, मालपुर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगांव, बोहरा, कळमसरे, पाडळसरे, निब, तांदळी या गावामध्ये दौरा काढला. या दौऱ्यामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधत हा परिसर कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून ह्या भागात नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
परिसरात अपेक्षित विकासकामे झाली नसल्याने डॉ. शिंदे यांनाच पसंती… गेल्या दहा वर्षापासून मारवड गाव व परिसरात ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे न झाल्याने महाविकास आघाडीला याचा नक्कीच फायदा होणार आहे. गेल्या तीन वर्षापासून परिसरात अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ व वादळाने शेतीपिकांचे नुकसान होऊन बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शासन शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने यंदा बळीराजा ह्या जुलमी सरकारच्या राजवटीवर नांगर फिरवणार असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रचार दौऱ्यादरम्यान डॉ. अनिल शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात येऊन घरोघरी माता भगिनींनी औक्षण करत
विजयाचा आशीर्वाद दिला.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.