मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना
अमळनेर : शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 24 बाय 7 या नगरपरिषदेच्या 197 कोटींच्या नवीन पाणीपूरवठा योजनेची ई टेंडर प्रक्रिया सुरू झाली असुन तातडीने काम सुरू करण्यासाठी पालिकेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने नगरोथान योजनेंतर्गत राज्यशासनाची या योजनेला मंजुरी मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय दि.13 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झाला होता.त्यानंतर नगरपरिषदेने ई टेंडर नोटीस प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.दरम्यान सदर योजना पाडळसरे धरणावरून असून सुमारे 197 कोटी 22 लक्ष 52 हजार 595 रुपयाचा निधीतून ही योजना पूर्णत्वास येणार आहे.धरणावरून उचललेले पाणी कळमसरे, खेडी, वासरे, चौबारी, जैतपिर, गलवाडे बु व खुर्द आणि तेथून ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील नवनाथ टेकडीवरील नव्याने होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन तेथून शहरातील जलकुंभामध्ये वितरित होणार आहे.विशेष म्हणजे सदर योजनेत पाणी उचल केंद्र असलेल्या धरणावर आणि जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या नवनाथ टेकडीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात वीजबिलही वाचून अमळनेरकरांची वर्षभर तहान भागविण्यासाठी पाणीच पाणी उपलब्ध असणार आहे.यात विशेष बाब म्हणजे धरणावरून पाणी उचलण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून 9.14 द.ल.घ.मी.एवढे पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरीही घेण्यात आली असून शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेता ही मंजुरी घेतली गेली असून 2056 पर्यंत हे आरक्षण असणार आहे.सदर योजनेला 27 जून 2024 ला तांत्रिक मान्यता मिळाली.आणि धरणावरून पाणी आरक्षण साठी 10 जुलै 2024 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे.
पाडळसरे धरणावरून उचललेले पाणी जॅकवेल मधून पाडळसरे ,कळमसरे, वासरे , चौबारी , जैतपिर ,गलवाडे मार्गे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवनाथ टेकडीपर्यंत येईल. तेथून पाईप लाईन ने पाणी कोर्टाजवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या 20 मीटर उंचीच्या 25.80 लक्ष लिटर क्षमता असलेल्या टाकीत टाकले जाईल. तेथून शहरात पाणी वितरणसाठी 211.52 किमी नवीन जलवितरण पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान 24 बाय 7 ही नवीन पाणीपुरवठा योजना अमळनेर शहरासाठी खरोखरच उपयुक्त असून पाडलसरे धरणात बाराही महिने पाणी राहत असल्याने अमळनेर शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.विशेष म्हणजे सोलर प्रोजेक्त मुळे वीज बिल वाचणार असल्याने पालिकेचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.सदर योजनेचे काम लवकर सुरू होऊन लवकरच ती कार्यान्वित व्हावी यासाठी मंत्री अनिल पाटील व अमळनेर नगरपरिषद प्रयत्नशील आहे.