अमळनेर (योगेश पाने)– राज्यातील कापसाचे उत्पादन घेणारा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. व्यापारी वर्गाने सुरुवातीला कापसाला सुमारे दहा हजार रुपये इतका भाव दिला नंतर उत्पादन सुरु झाल्यावर सातत्याने भाव कमी केलेत. दहा हजार रुपये भाव मिळत असताना कापूस तोडणीसाठीचे दरहि जास्तीचे वाढले. आजही सातत्याने कापसाच्या दरात मोठी घसरण होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरणीमुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवूण ठेवला आहे.
राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 70 टक्के जिनिंग बंदच आहेत. तर काही टक्के जिनिंग सुरु करण्यात आले होते. तेही आता कापसाच्या अभावी बंद पडण्याची शक्यता आहे. कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यात काम करणाऱ्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याचा लांब धागा निघत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये मोठी मागणी असूनही यंदा कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कापसाअभावी बंदच आहेत. त्यामुळे राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावत आहे. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह जिनिंग चालकही संकटात सापडले आहेत. 2021-22 या वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही आठ ते साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला आहे. अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे.
कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची प्रतीक्षा शेतकरीबांधव करत आहेत. दुसरीकडे तालुक्यात व जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटना सतत समोर येत आहेत. गोदामात साठवून ठेवलेला कापूस चोरुन नेला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसते.