अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव निवडणूक २०२२ मध्ये प्राधिकरणाच्या गणित अभ्यास मंडळ सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. तीन सदस्य पदी निवडीत डॉ नलिनी पाटील यांना पहिल्या फेरीत प्रथम पसंतीची त्रेचाळीस टक्के मते मिळाली आणि त्या पहिल्या फेरीत एकमेव सदस्य म्हणून निवडून आल्या. डॉ नलिनी पाटील या महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ ईश्वर पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन, सचिव, सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य, उपप्राचार्य, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.