
लोण बुद्रुक, ता. अमळनेर (दि. 29 जानेवारी 2025) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोण बुद्रुक येथे वावडे केंद्राच्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख नानासाहेब छगन पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
परिषदेच्या सुरुवातीला इयत्ता ३ री च्या विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना, तर इयत्ता ४ थीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशासकीय कामकाज व जिल्हास्तरीय मार्गदर्शक PPT नुसार केंद्राचा आढावा घेण्यात आला. शिक्षकांनी गुणवत्तावाढ व अध्यापन पद्धती याबाबत अनुभव मांडले. ‘माझा वर्ग – माझे नियोजन’ या अंतर्गत मासिक नियोजनावर चर्चा करण्यात आली. FLN चाचणीचे विश्लेषण, हॅकॅथॉन उपक्रम नोंदणी व विविध परिपत्रकांबाबत केंद्रप्रमुख नानासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका सौ. लता बडगुजर, उपशिक्षक एस. एल. पाटील, तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षणार्थी तुषार शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. एस. एल. पाटील यांनी केले. शिक्षण परिषद वंदे मातरम व राष्ट्रीय गीताने समाप्त झाली.