
अमळनेर: पूर्वी चूल आणि मूल या चौकटीत मर्यादित असलेल्या महिलांना भारतीय संविधानाने सन्मान दिला आहे. संविधानामुळेच महिलांना शिक्षण घेण्याची, घराबाहेर पडण्याची आणि नोकरी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज महिलांना विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्या सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत आहेत. हे केवळ भारतीय संविधानामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन सौ. सुनीता मोरे यांनी केले.
त्या युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित “भारतीय संविधान” या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या.
भारतीय संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी आपल्या खास शैलीत आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब के. डी. पाटील, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.