माजी विद्यार्थ्यांची २२ वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

२००२ /२००३ इयत्ता दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

अटकाव न्यूज – हितेंद्र जे बडगुजर

अमळनेर: तालुक्यातील शिरसाळे गावातील बावीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली चाळिशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकावरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या दोन्ही आठवणींना उजाळा दिला.

शिरसाळे गावातील भिका यशोदा चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे 2002 2003 वर्षी इयत्ता दहावी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.

शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वल पाटील व सर्वच माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]