मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे,
गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची अमळनेरकराना आहे
अमळनेर: सुरुवातीला चुरशीच्या वाटणाऱ्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या कौशल्याने सूक्ष्म नियोजन करत मोठ्या मताधिक्याने पुन्हा विजयश्री खेचून आणली असून ते पुन्हा विधानसभेत दिसणार नाही या शरदचंद्र पवारांच्या विधानाला त्यांनी खोटे ठरवत आपली मतदारसंघात असलेली पकड सिद्ध केली आहे.
निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून मोठा विजयोस्तव साजरा केला. मंत्री अनिल भाईदास पाटील यांना 1,09,445 मते मिळाली. तर अपक्ष शिरीष चौधरी यांना 76010 मते मिळाल्याने अनिल पाटील 33 हजाराच्या लीडने विजयी झाले आहेत. डॉ. अनिल शिंदे मात्र 13,798 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
दरम्यान काल सकाळी 8 वाजता टाकरखेडा रस्त्यावरील शासकीय गोदामात मतमोजणीस सुरवात झाली,सुरवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या गेल्या,यात मंत्री अनिल पाटील यांनी आघाडी घेतली,त्यानंतर 9.30 वाजता ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीस प्रारंभ झाला,24 फेऱ्यांमध्ये मोजणी करण्यात आली,सुरवातीच्या फेरीपासुन अनिल पाटील दोन ते पाच हजारांच्या मताधिक्याने आघाडीवरच राहिले,अमळनेर शहरात काही केंद्रांवर शिरीष चौधरीनी मताधिक्य घेतले मात्र अनिल पाटलांचे मताधिक्य मात्र ते तोडू शकले नाही.अखेरच्या फेरीपर्यंत अनिल पाटलांनी आघाडी कायम ठेवत विजयश्री प्राप्त केला.निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी विजयाची घोषणा केल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांचे मतमोजणी कक्षात आगमन झाले,निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हस्ते अनिल पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले यानंतर तेथूनच विजयी मिरवणुकीस सुरवात झाली.
मिरवणूकित हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते,अनिल पाटील व माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी हे रथावर विराजमान झाले होते,ताडेपुरा,पैलाड व फरशी रोडवर जेसीबीच्या साहाय्याने फुले व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत डीजे, ढोल ताशे व लेझीम पथकाचा निनाद असल्याने कार्यकर्त्यानी जल्लोषात ठेका घेतला होता,गुलालाचा तर अक्षरशः सडा पडत होता,वाटेत अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले तर व्यापारी बांधव आणि नागरिकांनी बुके देऊन स्वागत केले,मिरवणूक मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांच्या मातोश्रीने औक्षण केले.येथेही कार्यकर्त्यानी प्रचंड जल्लोष केला,अनिल पाटील यांनी याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांचे व संपूर्ण जनतेचे आभार मानले तसेच पराभूत उमेदवार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ रविंद्र चौधरी यांच्यावर जोरदार निशाणा साधत बुच्चन वर अमळनेर विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्हीच विकत घेतले असून ज्यांनी त्यांच्यासाठी विनाकारण आपल्यावर खालच्या पातळीवर टीकेची झोड उठवली त्यांना सोडणार नाहीच असा इशारा देखील त्यांनी दिला व विकासाचा रथ असाच अबाधित राहील अशी ग्वाही दिली.यानंतर उपस्थित मंडळींकडून त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव झाला. मंत्री अनिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती धर्म पाळत उमेदवार असलेल्या खा.स्मिताताई वाघ यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, आता विधानसभा निवडणुकीत स्मिताताई वाघ यांनी देखील तेवढीच मेहनत अनिल पाटील यांच्या
विजयासाठी घेतली, भाजपा कार्यकर्ते देखील अतिशय प्रामाणिकपणे कामाला लागले होते त्याचाही फायदा अनिल पाटील यांना नक्कीच या निवडणुकीत झाला आहे.
मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे, 'ते यापुढे निवडून येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ' असे उद्गार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील
यांच्याविषयी काढले होते
. मात्र खुद्द मोठ्या पवारांच्या विधानाला खोटे ठरवत मंत्री पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. योग्य वेळी योग्य मोहरे वापरत विरोधात वक्तव्य करत शड्डू ठोकणाऱ्या माजी आमदार साहेबराव पाटील यांनाही जवळ केले. तसेच वाटपात ही हात आखडता न घेता कोणत्याही प्रकारचा भेदभाव न केल्याने मतदारांनी ही मोठा प्रतिसाद त्यांना दिला. एकंदरीत सूक्ष्म नियोजन केल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली असून यामुळे हे नेतृत्व मातब्बर असल्याचे सिद्ध झाले आहे.
जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खाते मिळणार
गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची अमळनेरकराना आहे आठवण
यंदाच्या निवडणुकीत अमळनेर येथे महायुतीचा मेळावा झाला असता त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल पाटील यांना जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढे चांगले खाते मिळू शकते असे भाकीत केले होते, अमळनेरच्या जनतेने आता त्यांना 33 हजारांचे मोठे मताधिक्य दिल्याने,मंत्री महाजन यांच्या वक्तव्याची
आठवण अमळनेरकराना असून महायुती सरकार आता त्यांना कोणते खाते देणार?असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव आमदार असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.