तालुक्यातील युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार,डॉ. शिंदेना विजयी करण्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांचे आवाहन,
अमळनेर: डॉ. अनिल शिंदे यांना निवडून दिल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून तालुक्यात इंडस्ट्रियल हब तयार करून युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांनी सांगितले आहे.
रोजगाराच्या संधी शोधत तालुक्यातील हजारो तरुण पुणे, मुंबई, सुरत, नाशिक या शहरात स्थलांतरित झाले असून गावे ओस पडत चालली आहेत. मागील लोकप्रतिनिधींनी उद्योगांच्या वाढीस पोषक वातावरण निर्मिती न केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. मात्र डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देऊन तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. गावोगावी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची सोय करून देण्यात येईल. विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे तालुक्यातील तरुणांनी नवीन संधी म्हणून डॉ. अनिल शिंदे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे संचालक वेदांशु पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून करणार प्रयत्न,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही महाराष्ट्रातील उद्योजकांची शिखर संस्था असून प्रत्यक्षपणे शासनाशी संपर्क ठेवून राज्यात रोजगार व उद्योग निर्मितीसाठी काम करीत असते. त्या संस्थेवर वेदांशु पाटील हे संचालक म्हणून निवडून आले असून या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून नवीन एमआयडीसी उभारून नवे उद्योगी अमळनेर उभे करण्याचा संकल्पही यावेळी वेदांशु पाटील यांनी बोलून दाखवला आहे.