अमळनेर: संतश्री सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, क्रांती वीरांगना लीलाताई व क्रांतिवीर उत्तमराव पाटील यांची क्रांतीभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात फार मोठा बदल घडून आला आहे. तत्त्वज्ञान केंद्र, खान्देश शिक्षण मंडळ, प्रताप मिल आणि विप्रो कंपनीमुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले जाणारे अमळनेरचे आता मात्र पूर्ण रूप पालटले आहे. गेल्या दहा पंधरा वर्षात अमळनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरात अनेक गावगुंड आणि त्यांना मानणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अवैध वाळूने अनेकांना गब्बर करून त्यांचे माफियात रूपांतर झाले. तालुक्यात जाती व समाजात भेद निर्माण केले गेले,
परिणामी दंगलीचे प्रमाण वाढून शहराच्या प्रतिमेला तडा गेला. घरफोडी, गुरेचोरी, अत्याचार आदी घटनात वाढ झाल्याने शहरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. स्थानिक प्रशासनावर वचक नसल्याने सामान्य जनतेची लूट वाढली आहे. ह्या बदललेल्या असुरक्षित वातावरणात कंटाळलेल्या सुसंस्कृत अमळनेरकराला पर्याय हवा म्हणून डॉ. अनिल शिंदे उमेदवारी करत असून त्यांना निवडून दिल्यास गलिच्छ राजकारणाला छेद देऊन निर्मळ समाजकारणाचा पाया रचण्यासाठी डॉ. शिंदे नेहमीच अग्रेसर असतील, त्यामुळे डॉ. शिंदे हेच अमळनेरकरांची प्रथम पसंती असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी सांगितले आहे.