सत्कारित झालेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यातही गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची घेतली शपथ
अमळने: मांडळ गावात नुकत्याच झालेल्या एका भव्य कार्यक्रमात गेल्या काही वर्षांत विविध शासकीय व खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम “हात सर्वांचा विकास गावाचा” या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमात जवळपास ४४ विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, फुल आणि वारकरी रुमाल देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री डॉ. अशोक हिम्मतराव पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ शुभांगी सुरेश पाटील, पोलीस पाटील मांडळ , ललिता विलास सोनवणे विकास सोसायटी मांडळ, आणि हिरालाल लक्ष्मण सोनवणे मुख्याध्यापक महानगरपालिका शाळा मुंबई होते. आणि गावातील इतर जेष्ठ व सन्माननीय नागरिक देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून श्री किरण शांताराम बडगुजर, शिक्षक, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडळ, श्री मुकेश भानुदास महाजन रामेती नाशिक, श्री भाऊसाहेब प्रल्हाद शिरसाट श्री साई समर्थ कोटिंग प्रा. लि. पुणे, श्री राहुल भिलाजी पाटील पोलीस उपनिरीक्षक, भडगाव लाभले होते. तसेच सत्कारमूर्ती मधून श्री सुधीर बी पाटील, श्रीमती तेजस्विनी गुलाब पाटील, श्री मुरलीधर सिताराम शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन सौ तृप्ती योगेश वानखेडे आणि आभार प्रदर्शन श्रीमती ललिता गोकुळपुरी बावा यांनी केले.यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
“हात सर्वांचा विकास गावाचा” हा व्हॉट्सॲप ग्रुप मांडळ गावातील होतकरू तरुण आणि बाहेर विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी ग्रामस्थांनी मिळून तयार केला आहे. या ग्रुपमधील सदस्यांना आपल्या गावाबद्दल विशेष प्रेम असून ते गावाच्या शैक्षणिक विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.गावातील शिक्षणासाठी नि:स्वार्थी योगदान या ग्रुपने गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची परंपरा सुरू केली आहे. तसेच शाळेच्या BALA (Building As Learning AIDS) या उपक्रमातही या ग्रुपने मोलाची मदत केली आहे. सध्या ग्रुपमार्फत गावात अभ्यासिका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी शासकीय नोकरी मिळवू शकतील.
गावाचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न
या कार्यक्रमात बोलताना डॉ. अशोक पाटील यांनी “हात सर्वांचा विकास गावाचा” या ग्रुपच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी या ग्रुपच्या प्रयत्नांमुळे मांडळ गाव शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे सांगितले. त्यांनी गावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
सत्कारित झालेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी “हात सर्वांचा विकास गावाचा” या ग्रुपचे आभार मानले आणि भविष्यातही गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची शपथ घेतली.
गावकऱ्यांचा उत्साह
या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि या ग्रुपच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या आहेत